सिंहगड किल्ल्याच्या कामांतील भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवप्रेमींची संतप्त निदर्शने !

Share this News:

अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक उभारण्याआधी सिंहगड किल्ल्याच्या कामांत भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करा !- हिंदुत्ववाद्यांची एकमुखी मागणी
पुणे – सिंहगड किल्ल्याच्या डागडुजीच्या कामांत भ्रष्टाचार होऊन तीन वर्षे उलटून गेली, तरी भ्रष्टाचार्‍यांवर अद्याप कठोर कारवाई झालेली नाही. केवळ एका कनिष्ठ अधिकार्‍यावर दिखाऊ आणि थातूरमातूर कारवाई करून संपूर्ण प्रकरण दडपून टाकण्याचे षड्यंत्र चालू आहे. हा संघटीत भ्रष्टाचार असल्यामुळे पुरातत्त्व खात्यातील भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदार आणि अन्य वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यावरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. सिंहगड किल्ल्याच्या कामांतील भ्रष्टाचाराबाबत काही न करणारे शासन ३६०० कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणार्‍या भव्य शिवस्मारकाच्या कामात असे होणार नाही, याची शाश्‍वती देईल का ? यासाठी अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याआधी सिंहगडाच्या कामात भ्रष्टाचार करणार्‍यांवर सरकारने कारवाई करून दाखवावी, मग शिवस्मारक बांधावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सरकारला केला. या सिंहगड किल्ल्याच्या कामांत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पुरातत्त्व खात्याच्या पुणे विभागीय कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात श्री. गोखले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या गडकोटांशी द्रोह हा छत्रपती शिवरायांशी द्रोह आहे. भ्रष्ट कारभार करणार्‍यांना छत्रपती शिवराय ज्या पद्धतीने शिक्षा देत होते, तशा प्रकारे जर भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा मिळाली, तरच हे शिवशाही शासन आहे, असे म्हणता येईल. या भ्रष्टाचार्‍यांना सरकार पाठिशी घालणार असेल, तर त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा काही नैतिक अधिकार रहाणार नाही, असेही श्री. गोखले म्हणाले. या वेळी आंदोलनात माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, शिवसेनेचे प्रखर कार्यकर्ते सचिन जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक, हिंदु विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अन्य शिवप्रेमी उपस्थित होते. आंदोलन झाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी यांनी साहाय्यक संचालक विलास वहाने यांना आंदोलनातील मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर विलास वहाने आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यात भ्रष्टाचाराविषयी चर्चा झाली. तुम्ही विचारलेल्या प्रश्‍नांचा आणि मागण्यांचा पाठपुरावा नक्की करू आणि अहवाल पाठवू, असे आश्‍वासन वहाने यांनी दिले.
शिष्टमंडळ आणि विलास वहाने यांच्यात चर्चा झाली. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी विचारलेले काही प्रश्‍न
१. १. पुरातत्व विभागाकडून मिळालेल्या पत्रातील माहितीनुसार कंत्राटदार अरुण लांजेवार यांना आतापर्यंत ३१ लाख ७ रुपये देण्यात आले. प्रत्यक्षात एवढी रक्कम कुठल्या नियमांनुत सार दिली? रक्कम देण्याआधी झालेल्या कामाचे गुणवत्ता परीक्षण (क्वालिटी ऑडिट) केले होते का?
२. जर कनिष्ठ अभियंत्याने जाणीवपूर्वक अन्य कोणालाही न दाखवता निविदा काढली असेल, तर ते एकूण प्रक्रियेत कुठेही लक्षात आले नाही अथवा थांबवले गेले नाही, असे कसे होऊ शकते? अन्यही अधिकारी या प्रकरणी उत्तरदायी नाहीत का?
३. संबंधित कंत्राटदार, नियुक्त वास्तुविशारद आसिंबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अजूनही फौजदारी गुन्हे प्रविष्ट का नाही केले?
४. कंत्राटदार स. वि. दळवी यांच्यावर वर्ष २०११ मध्ये भ्रष्टाचार केल्यावरून कारवाई झाली असताना २०१३ या वर्षी पुरातत्व विभागाकडून ’किल्ले सर्किट’ प्रोजेक्ट मध्ये त्यांना पुन्हा शिबीर प्रमुख म्हणून का नेमण्यात आले?
५. किर्लोस्कर कन्सल्टंट ची सनद रहित करण्याची मागणी पुरातत्व विभागाकडून करायला हवी होती, ती का करण्यात आली नाही ?
या सर्व प्रश्रांवर सहाय्यक संचालक विलास वहाने यांना स्पष्ट उत्तरे देता आली नाहीत.
आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या
१. नियुक्त केलेले कंत्राटदार, वास्तुविशारद, किर्लोस्कर सल्लागार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करावे.
२. बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची संपूर्ण रक्कम संबंधित कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून सव्याज वसूल करण्यात यावी.
३. छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणार्या किल्ल्यांमध्ये भ्रष्टाचार करणार्या अधिकार्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, तसेच किल्ल्याचे बांधकाम प्रामाणिक आणि तज्ञ कंत्राटदाराकडून तातडीने करवून घेण्यात यावे.
४. दुर्ग संवर्धनाविषयी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे ना, हे पडताळण्याची कार्यपद्धत प्रशासनाने निश्‍चित करावी.
शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आज दुपारी ३ वाजता येरवडा येथील पुरातत्त्व खात्याच्या पुणे विभागीय कार्यालयासमोर संतप्त निदर्शने करण्यात आली. या वेळी आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर त्वरित कठोर कारवाई व्हावी, यासाठी घोषणा देण्यात आल्या.