वानवडीमध्ये साकारले ‘चाईल्ड ,फॅमिली फ्रेंडली रोड क्रॉसिंग’

Share this News:

9/12/2019, पुणे :

सतत रहदारीने वाहणारा रस्ता पार करून उद्यानात जाणे लहानग्यांना ,त्यांच्या समवेत असणाऱ्या कुटुंबियांना सोपे व्हावे या हेतूने वानवडीमध्ये शिवरकर उद्यानाजवळ ‘चाईल्ड ,फॅमिली फ्रेंडली रोड क्रॉसिंग ‘ साकारण्यात आले आहे ! क्रॉसिंग लक्षात यावे म्हणून रंगवलेले आकर्षक पट्टे,लहान मुले क्रॉस करतानाची चिन्हे ,पादचाऱ्यांना गाड्या पार होईपर्यंत थांबण्यासाठी थांबता येतील अशा ‘जागांवर केलेल्या ‘नो पार्किंग ‘ ,झिग -झॅग खुणा ,सायनेजेस अशा अनेक नव्या आणि कल्पक गोष्टी येथे साकारण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पुणे पालिका ,इकोफर्स्ट ,बर्नार्ड लिअर फाउंडेशन,तरु लिडिंग एज ‘ या संस्थांच्या सहकार्याने पादचाऱ्यांसाठी या आकर्षक आणि उपयुक्त क्रॉसिंग सुविधा साकारल्या आहेत . त्या साकारताना आपल्या आर्किटेक्चर च्या ज्ञानाचा उपयोग केला आहे . दिनांक ७ ते ९ डिसेंबर दरम्यान या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला . त्यासाठी त्यांना प्रा . अमीर पटेल ,प्राचार्य लीना देबनाथ यांचे मार्गदर्शन लाभले .

रस्त्याच्या दोन्ही बाजूला किमान १०० फूट इतका पदपथ उपलब्ध करण्याची दक्षता येथे घेण्यात आली आहे . ‘अर्बन ९५’ या संकल्पनेअंतर्गत हा प्रकल्प साकारण्यात आला आहे . या संकल्पनेनुसार वय वर्ष ३ असणाऱ्या बालकालाही रस्ता पार करता आला पाहिजे ,अशा सुविधा निर्माण केल्या जातात . पुणे पालिका ,इकोफर्स्ट ,बर्नार्ड लिअर फाउंडेशन,’तरु लिडिंग एज ‘ या संस्थांच्या सहकार्याने ‘अर्बन ९५’ संकल्पना पुण्याच्या रस्त्यांवर साकारण्याचा प्रयत्न सुरु आहे ,असे प्रा अमीर पटेल यांनी सांगितले .

पालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले ,’ रस्ते अधिक सुरक्षित आणि सुकर व्हावेत यासाठी पालिका अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे . अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या विद्यार्थ्यांनी हा चांगला पथदर्शक प्रकल्प साकारला आहे . या बाबत नागरिकांचा प्रतिसाद पाहून अन्य ठिकाणी हा प्रकल्प साकारण्याचा मानस आहे ‘. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे कौतुक केले . ‘आम्ही कल्पक आणि सामाजिक उपक्रमांना नेहमीच पाठिंबा देतो आणि शहर हिताच्या साठी विद्यार्थ्यांना काम करण्यास उद्युक्त करतो ‘,असे डॉ पी ए इनामदार यांनी सांगितले .