सोसायटी पुनर्विकासने कोथरूडचा होणार कायापालट – चंद्रकांत पाटिल यांना विश्वास

Share this News:

18/10/2019, पुणे -कोथरूडमधील हजारो सोसायट्यांचा महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर कोथरूडचा खऱ्या अर्थाने कायापालट होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवार माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.

कोथरूड परिसरातील अनेक छोट्या मोठ्या सोसायट्यांनी चंद्रकांत  पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच चंद्रकांत दादा पाटील यांनी अतिशय खुलेपणाने सोसायट्यांमधील मेळाव्यांमध्ये सहभागी होत स्थानिक प्रश्नांची माहिती करून घेतली. तसेच त्यासंदर्भात राज्य सरकारच्या धोरणांच्या माध्यमातून कायमस्वरूपी ठोस तोडगे कसे काढता येतील याबाबत विचारविनिमय केला.

अनेक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोथरूड परिसरामध्ये सध्याच्या नियमानुसार नऊ मीटर किंवा त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील सोसायट्यांचा पुनर्विकास शक्य आहे. त्यामध्ये बदल करून सहा मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या सोसायट्यांचादेखील देखील पुनर्विकास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. नागरीकरणाच्या समस्यांवर रामबाण तोडगा म्हणून सोसायटी पुनर्विकास ही योजना महत्त्वाकांक्षी ठरणार आहे.

पुनर्विकासासाठी सोसायट्यांची जागा संपादन करीत असताना त्याच्या मागील सोसायटी बरोबर एकत्रित पुनर्विकास करता येणे शक्य आहे काय? तसेच आडवा विस्तार करण्यास मर्यादा असल्याने उभा विस्तार म्हणजेच वाढीव एफएसआय देऊन इमारतींचे मजले वाढवीत विकास करणे शक्य आहे काय? त्याच प्रमाणे मुंबईत परळ परिसरामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचा विकास करण्यात आला आहे. ती योजना कोथरूडमध्ये यशस्वी करता येईल काय, अशा अनेक पर्यायांचा विचार आपण करीत आहोत.

कोथरूड २.० या एकविसाव्या शतकातला साजेशा नवीन कोथरूड ची निर्मिती करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगून चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की राज्य सरकारची विकासाभिमुख धोरणे राबविताना त्याला स्थानिक प्रशासनाबरोबरच नागरिकांची साथ देखील अतिशय मोलाची आहे. कोथरूड मधील सुजाण सजग आणि सुशिक्षित नागरिक ती साथ नक्कीच देतील, असा विश्वास देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.