महावितरणच्या प्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘खरं सांगायचं तर..’ अव्वल

कराड, (जि. सातारा), दि. 12 नोव्हेंबर 2019 : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडळाचे ‘खरं सांगायचं तर’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. तर बारामती परिमंडलाचे ‘ब्रीज’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

बारामती परिमंडल आयोजित येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनामध्ये (टाऊन हाँल) मंगळवारी (दि. 12) दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा समारोप झाला. महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सचिन तालेवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले (कोल्हापूर परिमंडल), प्रभारी मुख्य अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर (बारामती परिमंडल) यांच्याहस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर परिक्षक सौ. सुप्रिया भागवत, श्री. प्रशांत गोखले, श्री. राज कुबेर यांची उपस्थिती होती.

नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (दि. 12) पुणे परिमंडलाने उदय नारकर लिखित ‘खरं सांगायचं तर..’ हे नाटक सादर केले. मानवी नात्यांचा उत्कंठावर्धक नाट्यातून वेध घेणार्‍या सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार दिग्दर्शित या नाटकामध्ये अपर्णा मानकीकर, संतोष गहेरवार, सचिन निकम, विजय जोशी, शैलेंद्र भालेराव आदी प्रमुख भूमिकेत होते. कोल्हापूर परिमंडलाने हणमंत नलवडे दिग्दर्शित ‘चरणदार चोर’ हे सामाजिक विषयावरील नाटक सादर केले व नाट्यरसिकांची दाद मिळविली. या नाटकामध्ये महेश कांबळे, नजीर अहमद मुजावर, शिवराज आणेकर, सोनाली बेंद्रे आदी कलावंतांनी भूमिका केल्या.

नाट्यस्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून पुणे परिमंडलाच्या ‘खरं सांगायचं तर..’ या नाटकाला प्रथम तर बारामती परिमंडलाच्या ‘ब्रीज’ या नाट्यकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. यासोबतच दिग्दर्शन – प्रथम – पंकज तगलपल्लेवार (पुणे), द्वितीय – श्रीकृष्ण वायदंडे (बारामती), अभिनय (स्त्री) – प्रथम – अपर्णा माणकीकर (पुणे), द्वितीय- सोनाली बेंद्रे (कोल्हापूर), अभिनय (पुरुष) – प्रथम- संतोष गहेरवार (पुणे), द्वितीय – राम चव्हाण (बारामती), नेपथ्य – भरत अभंग व राजेंद्र हवालदार (पुणे), द्वितीय – अभिमन्यू राख (बारामती), प्रकाशयोजना – प्रथम – किरण दौंड व कुमार गवळी (पुणे), द्वितीय – महावीर शेंडगे (बारामती), पार्श्वसंगीत – संजय नायकवडी व पवन देशमुख (पुणे), द्वितीय – नीलेश गव्हाणे (बारामती), रंगभूषा व वेशभूषा – प्रथम – कीर्ती भोसले, द्वितीय नितीन सावर्डेकर (कोल्हापूर) तर अभिनयाच्या उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी रुकय्या शिलदार (बारामती), निकिता खैरनार (पुणे), व मंगेश कांबळे (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली. कल्याण येथे या महिन्यात होणार्‍या महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘खरं सांगायचं तर..’ हे नाटक पुणे प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

पारितोषिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारामती परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष भोसले यांनी केले तर श्री. स्वप्नील जाधव यांनी यांनी आभार मानले.