जिल्ह्यातील पेडपेडींग 9362 कृषीपंपांना लवकरच एचव्हीडीएसमधून वीजजोडणी

Share this News:

पुणे, दि. 04 जुलै 2018 : जिल्ह्यातील महावितरणच्या पुणे व बारामती ग्रामीण मंडलअंतर्गत 9362 कृषीपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या सर्व वीजजोडण्यांसाठी 141 कोटी 8 लाख रुपयांच्या विविध कामांसाठी निविदा मागविण्यात आलेल्या आहेत.

सध्या राज्यातील कृषीपंपांना प्रचलित पद्धतीनुसार 63 केव्हीए /100 केव्हीए क्षमतेच्या वितरण रोहित्राद्वारे लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. एका रोहित्रावर जवळपास 15 ते 20 कृषीपंपांना वीजपुरवठा केला जातो. लघुदाब वाहिनीची लांबी अधिक असल्याने वीजचोरी होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होणे, तांत्रिक हानी वाढणे, रोहित्र वारंवार बिघडणे व वीजपुरवठा खंडित होणे आदी समस्यांवर एचव्हीडीएस प्रणालीद्वारे मात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कृषीपंपांना सुरळीत व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजजोडण्या एचव्हीडीएस प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत.

मार्च 2018 अखेर पैसे भरून प्रलंबित राहणाऱ्या राज्यातील 2,24,785 कृषीपंपांना एचव्हीडीएस प्रणालीद्वारे नवीन वीजजोडणी देऊन वीजपुरवठा करण्यासाठी 5014 कोटी 13 लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये 4496 कोटी 69 लाख रुपयांचा निधी उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) उभारण्यासाठी तर 551 कोटी 44 लाख रुपयांचा निधी राज्यात 226 नवीन उपकेंद्र उभारण्यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीत महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडलअंतर्गत हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, मुळशी, वेल्हे व मावळ तालुक्यांमध्ये प्रलंबित 3419 कृषीपंपांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी 50 कोटी 169 लाख रुपयांच्या तसेच बारामती ग्रामीण मंडल अंतर्गत बारामती, शिरुर, दौंड, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील प्रलंबित 5,943 कृषीपंपांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी 90 कोटी 92 लाख रुपयांच्या विविध कामांसाठी ऑनलाईन निविदा मागविण्यात आलेल्या आहेत.

चौकट – एचव्हीडीएस प्रणालीचे प्रमुख फायदे –

उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) द्वारे शाश्वत व सुरळीत वीजपुरवठा होईल.

उच्चदाब वाहिनी उपकेंद्गातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने वीज अपघात टळतील

उच्चदाब वाहिन्यांवरील वीजप्रवाह कमी झाल्यामुळे आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही व वीजहानीमध्ये घट होईल

एचव्हीडीएसमधून प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन कृषीपंपांचा वीजपुरवठा असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी होईल. वीजचोरी सुद्धा कमी होईल.

कृषीपंपधारकांनी विद्युत भाराच्या मागणीनुसार रोहित्रांची क्षमता ठरविण्यात येईल. या प्रणालीमध्ये 10 केव्हीए, 16 केव्हीए व 25 केव्हीए क्षमतेचे रोहित्र वापरण्यात येतील.

उच्चदाब वाहिनी ही ग्राहकाच्या विहिरीपर्यंत उभारण्यात येणार असल्याने लघुदाब वाहिनी विरहित वीजजोडणी राहणार आहे.

कृषीपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होईल व रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण खूप कमी होईल.