Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

नवीन आव्हाने व तंत्रज्ञानानुसार बदल आत्मसात करा 

अहमदनगर: सद्यस्थितीत विज वितरण व्यवसायाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. नवनवीन आव्हाने यातून निर्माण होत आहेत. ही आव्हाने व नवीन तंत्रज्ञानानुसार बदल आत्मसात केला तरच महावितरण स्वतःच्या बळावर सक्षमपणे उभे राहू शकेल, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ येथे आयोजित सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या ४५ व्या वार्षिक अधिवेशनप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. जलसंधारण मंत्री श्री. राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, महापारेषणचे संचालक गणपत मुंढे, महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. सतीश करपे, श्री. संजय ताकसांडे, मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर, श्री. सुरेश गणेशकर, असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार म्हणाले, नवीन तंत्रज्ञान, ग्राहकांच्या अपेक्षा, नवीन धोरण, वितरण क्षेत्रातील स्पर्धा आणि वीज निर्मिती क्षेत्रातील मोठे बदल यासारख्या विविध कारणांमुळे वीज वितरण व्यवसायात कमालीचे बदल होत आहेत. हे बदल समजून घेऊन आपल्या कार्यप्रणालीत आवश्यक त्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा संघटना प्रबळ असूनही काही सार्वजनिक उपक्रम धोक्यात आल्याची उदाहरणे आहेत. त्यासाठीच एकूणातील ५ टक्के मीटर रिडींगची फेरपाडताळणी, फिडर रिडींग आदींसारख्या उपाययोजना आखल्या असून त्यांना योग्य प्रतिसाद अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, एम्प्लॉयी पोर्टल आणि डॅशबोर्ड या दोन सुविधा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. एम्प्लॉयी पोर्टलमध्ये वैयक्तिक सेवेशी संबंधित सर्व बाबींसोबतच आवश्यक परिपत्रकेही माहितीसाठी देण्यात आली आहेत. तर कारवाईशी संबंधीत प्रकरणे निश्श्चित कालमर्यादेत निकाली काढण्याची तरतूद यात आहे. यासोबतच येऊ घातलेल्या कर्मचारी पून:र्रचनेत संचालन, दुरुस्ती, बिलिंग, वसुली अशा विविध कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ देण्यात येणार आहे. यातून जबाबदारी निश्चित होऊन कामात सुसूत्रता येईल. प्रत्येकाचा जॉब-चार्ट तयार असेल व कामात सुस्पष्टता येईल. प्रत्येक क्षेत्रात काम केल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळणार नसल्याचे श्री. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले. महावितरण डिजिटल युटिलिटी म्हणून जाहीर करण्यात आले असून लवकरच सर्व महावितरणची सर्व देणी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसच्या माध्यमातून चुकती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

इलेक्ट्रिक चार्जिंगचे ५०० सेंटर

इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा देणारे ५०० सेंटर राज्यात स्थापन करण्यात येणार आहेत. काळाची पावले ओळखून तसेच राज्यातील वीज ग्राहकांचे योगदान लक्षात घेऊन ही सुविधा देण्यात येणार असल्याचे श्री. संजीव कुमार यांनी सांगितले.

Support Our Journalism Contribute Now