नाईचाकूर येथे मोफत आरोग्य तपासणी व संवाद मेळावा संपन्न

just pune things app
Share this News:

            उस्मानाबाद,दि.21:- प्राथमिक आरोग्य केंद्र नाईचाकूर ता. उमरगा येथे दि 20 डिसेंबर 2016 रोजी  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी कार्यक्रमांतर्गत शेतकरी व  त्यांचे पाल्य यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर मेळाव्याचे उद्घाटन आ. श्री. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी परिविक्षाधिन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.एकनाथ माले,  जिल्हा परिषद सदस्या श्रीमती अलकाताई भोसले, कृषी उत्पन्न बाजार समिती  सभापती श्री नानाराव भोसले, गोविंद पवार, नाईचाकुरचे उप सरपंच  श्री शिवाजीराव पवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. पांचाळ,डॉ.के के.मिटकरी, तालुका आरोग्य अधिकारी उमरगा  डॉ. श्रीमती बळे, डॉ. बनसोडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

           जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे  यांनी आरोग्य मेळाव्यासाठी उपस्थित लाभार्थीं, शाळकरी मुले-मुली  यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, चांगले  आरोग्य ठेवण्यासाठी  30 वर्षांपुढील प्रत्येकांनी आजार असेल किंवा नसेल तरीही आरोग्य तपासणी करून घ्यावी. प्राथमिक आरोग्य स्तरावरील सर्व शासकीय योजना व आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

परिविक्षाधिन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थितांना मार्गदर्शन करताना  म्हणाले की , शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेस समुपदेशन करण्यासाठी आरोग्य गट, शेतकरी मदत गट तयार करण्यात यावेत. या गटांनी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेला देण्यात यावी व शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारू नये. शासनमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले.

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एकनाथ माले  यांनी यावेळी  “मीच माझा डॉक्टर” ही संकल्पना विशद केली. ग्रामीण भागातील जनतेने आरोग्याची काळजी घेताना परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरावे, तंबाखु,गुटखा,मावा असे तंबाखूजन्य पदार्थ  खावू  नयेत. तसेच प्रणायाम, योगा यासारखे व्यायाम करावेत.

शासना मार्फत  शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत शेतकरी व  त्यांचे पाल्य यांची प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर  तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी, संवाद मेळावे आयोजित करून शेतकत्यांना मानसिक समुपदेशन करण्यात येते. शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती व नापिकीला कंटाळून आत्महत्या करू नये, परिस्थितीचा धिराने सामना करावा, शासन व मी  स्वत: जनतेचा लोकप्रतिनीधी या नात्याने मदत करण्यास सदैव तयार आहे. असे आ. श्री ज्ञानराज चौगुले यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

           आरोग्य मेळाव्याच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना  उपक्रम व आरोग्य विषयक माहितीचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यासोबत महिला बाल कल्याण विभागामार्फत सकस आहाराबाबत माहितीचे प्रदर्शन व पदार्थ प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते. या मेळाव्यास शाळेतील मुले, मुली, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील महिला, पुरूष, स्थानिक गावकरी आरोग्य तपासणीसाठी लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बळे यांनी केले,सुत्रसंचलन श्री. शिवाजी राठोड तर आभार डॉ. अभिजीत बनसोडे यांनी मानले.