पूरपरिस्थितीमुळे बारामती, सासवड व केडगाव विभागातील 585 रोहित्रांचा वीजपुरवठा बंद

Mahavitaran-Logo
Share this News:

बारामती दि. 5 आॅगस्ट 2019 : संततधार पावसामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच धरणांतून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग यामुळे बारामती मंडल अंतर्गत बारामती, केडगाव व सासवड विभागातील सुमारे 585 वितरण रोहित्रे सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. पुराच्या पाण्याचा धोका निवळताच हे रोहित्र पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत.

 

बारामती मंडल अंतर्गत घाडगेवाडी, सांगवी (ता. बारामती) व तावशी (ता. इंदापूर) तसेच पारगाव, सिद्धटेक (ता. दौंड) या परिसरातील सुमारे 40 रोहित्रांचा वीजपुरवठा पुराच्या पाण्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे. तसेच भोर तालुक्यातील भाटघर धरणालगतच्या उपकेंद्रातील कंट्रोल रुममध्ये पाणी शिरल्याने 5 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या वीजवाहिन्यांवरील 497 रोहित्रांचा सुद्धा वीजपुरवठा बंद आहे. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मांडकी, जेजुरी, निरा, परिंचे, शिरवली वीजवाहिन्यांवरील 48 रोहित्र पूर परिस्थितीतमुळे बंद ठेवण्यात आले आहेत.

 

विद्युत अपघाताचे धोके टाळा – मुख्य अभियंता श्री. पावडे

 

संततधार पाऊस व पूर परिस्थितीमध्ये वीजपुरवठा सुरळीत करताना जनमित्रांनी धोके टाळून व सुरक्षेचे सर्व उपाय योजूनच वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करावे, असे आवाहन बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी केले आहे. तसेच पूरपरिस्थितीमधील वीजयंत्रणेचा अपवाद वगळता उर्वरित भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अभियंता व जनमित्रांनी तत्पर राहावे, असे निर्देश सुद्धा त्यांनी दिले आहेत. बारामती परिमंडलामधील विविध भागात सध्या संततधार पाऊस सुरु आहे. धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. या पार्श्वभूमिवर मुख्य अभियंता श्री. पावडे यांच्याकडून सर्व विभागातील वीजपुरवठ्याच्या स्थितीचा दररोज सकाळी व सायंकाळी आढावा घेण्यात येत आहे तसेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मार्गदर्शन व सूचना करण्यात येत आहेत.

 

वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना देण्यात यावी. वीज अपघात टाळण्यासाठी जनमित्रांनी सुरक्षा साधनांचा वापर करावा व सतर्कपणे दुरुस्तीचे काम करावे व नागरिकांनाही वीजअपघात टाळण्याबाबत उपाययोजनांची माहिती द्यावी, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. पावडे यांनी केले आहे.