पेट्रोल-डिझेलवर लावलेला ११ रु. चा सेस काढून टाका – नवाब मलिक

Share this News:

मुंबई –  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सप्टेंबर २०१५ साली प्रति लिटर ९ रू. एवढा दुष्काळ सेस लावला होता. तरिही मागच्या दोन वर्षात सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही. आज महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला आहे. तसेच १ एप्रिल पासून महामार्गालगत असलेली दारूची दुकाने न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आली होती. त्याचा महसूल बुडत असल्यामुळे पुन्हा प्रति लिटर २ रू कर लावण्यात आला. दारू न पिणाऱ्या लोकांनाही या कराचा भुर्दंड पडत होता. आता न्यायालयानेही ही बंदी उठवली आहे. त्यामुळे दुष्काळ आणि दारूचा मिळून ११ रुपये असलेला अतिरीक्त कर राज्य सरकारने त्वरीत बंद करून जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते. जागतिक पातळीवर क्रूड ऑईलचे भाव निम्म्याहून कमी झाल्यानंतरही महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या १५ दिवसांत पेट्रोल-गॅस दरवाढीच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले होते. केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री देवेंद्र प्रधान म्हणतात की, राज्य सरकारांनी लावलेले कर कमी केल्यास पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील. त्यामुळे राज्य सरकारने याविषयी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी मलिक यांनी केली.