महाराष्ट्र – पुढील जागतिक आर्थिक, व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र बनण्यासाठी सज्ज

Share this News:

राणा कपूर, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, येस बँक व अध्यक्ष, 

येस ग्लोबल इन्स्टिट्यूट

महाराष्ट्र राज्य हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे शक्तीशाली केंद्र आणि देशाच्या आर्थिक राजधानीचा समावेश असलेले राज्य आहे. राज्यात सर्वाधिक परकीय गुंतवणूक केली जाते आणि मला वाटते हे राज्य भविष्यकालीन डिझाइन, नवनिर्मिती आणि कल्पकतेवर आधारित उद्योजकतेच्या संधी यांचे पुढील जागतिक आर्थिक, व्यावसायिक व सांस्कृतिक केंद्र बनण्यासाठी सज्ज झाले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या नुकत्याच पार पडलेल्या जर्मन भेटमध्ये कुलगूर अँजेला मेर्केल यांच्याशी झालेल्या संवादात आम्ही एकमेकांसाठी बनलेलो आहोत असे सूचक विधान करत भारत कायमच आपला शक्तीशाली, सुसज्ज आणि सक्षम भागिदार जर्मनीला देऊ करेल असे संकेत दिले. दोन्ही देशांमधील नातेसंबंधाच्या पायावर भारताची अधिक औद्योगिक अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल वेगवान होईल.

या टप्प्यावर आल्यावर मला असे वाटते, की महाराष्ट्राची जर्मनीशी तुलना ही धोरणात्मकदृष्ट्या अतिशय उत्सुकतापूर्ण आणि विचारांना चालना देणारी आहे. भारतातील महाराष्ट्राची आर्थिक स्थितीचा थेट ईयूमधील जर्मनीच्या आर्थिक स्थितीशी संबंध लावता येईल. दोन्ही प्रदेशांकडे वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, अन्न प्रक्रिया व इतर महत्त्वांच्या क्षेत्रातील चांगल्या प्रकारे विकसित झालेली यंत्रणा असून तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात ते आघाडीवर आहेत.

धोरणात्मक हस्तक्षेपातून आलेल्या कित्येक अशा गोष्टी आहेत, ज्यांच्या आधारे महाराष्ट्र आपल्या विकासाच्या संधींना चालना देऊ शकतो. उदा. जर्मनीतील मित्तेलस्टँड (मध्यम आकाराचे व्यवसाय) देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहेत. जर्मनी या क्षेत्राला चालना देणाऱ्या योजना, व्हीसी अनुदान, अनुकूल धोरणे आणि निधी यांद्वारे सक्रियपणे पाठिंबा देत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही या क्षेत्रातील प्रचंड मोठ्या गुणवत्तेला चालना देऊन उद्योजकेची संस्कृती जोपासता येईल. मला असे प्रामाणिकपणे वाटते, की पुढील संकल्पनांवर बहुआयामी लक्ष दिल्यास राज्याला अमर्याद विकास साधता येईल.

नाविन्य/संशोधन

जर्मन विकासाच्या कहाणीमध्ये कायम स्थिर असलेला घटक म्हणजे – नाविन्य, जे जर्मन व्यावसायिक संस्कृतीत खोलवर रूजलेले असून त्याला शैक्षणिक संस्था व सार्वजनिक संशोधन संस्थांच्या यंत्रणेचा आवश्यक पाठिंबा लाभलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही प्रस्थापित शैक्षणिक केंद्रे, औद्योगिक केंद्रांचे अस्तित्व आणि पायाभूत सुविधा व निधीच्या उपलब्धतेमुळे अशाचप्रकारची रचना, नाविन्य आणि संशोधन व विकास संस्कृती निर्माण करता येईल.

मुंबई- नागपूर एक्सप्रेसवे समृद्धी कॉरिडारचा विकास हे या नाविन्याचे केंद्रीकरण तो जात असलेल्या १२ जिल्ह्याच्या उच्च आर्थिक विकासासाठी आणि प्रभावित क्षेत्रामध्ये असलेल्या इतर १२ जिल्ह्यांच्या विकासासाठी पूरक ठरेल. यामध्ये मुंबईबरोबरच पुण्यातही भारताचे प्रमुख संशोधन केंद्र बनण्याची क्षमता आहे.

मुंबईमध्ये फिनटेक यंत्रणा विकसित करण्यासाठी आवश्यक ते सर्व घटक – तंत्रज्ञान कंपन्या, बाजारपेठेची उपलब्धी, गुणवत्ता, भांडवल, इनक्युबेटर्स आणि संशोधन केंद्रे उपस्थित आहेत. फिनटेक कौन्सिलच्या अंतर्गत धोरण हस्तक्षेपासह मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये भारताचे फिनटेक केंद्र बनण्याची आणि त्याद्वारे संपूर्ण अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याचे सर्व गुणधर्म आहेत.

पायाभूत सुविधा

एकंदर पायाभूत सुविधा क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्राची परिस्थिती उतरांपेक्षा चांगली आहे – तरीही जागतिक दर्जा प्राप्त करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने नुकत्याच हाती घेतलेल्या काही प्रयत्नांपैकी औरंगाबाद औद्योगिक शहराचा विकास, ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक शहर अशा योजना त्या त्या प्रदेशांमध्ये औद्योगिक सुधारणा घडवून घेण्यासाठी टिकाऊ पायाभूत सुविधा उभारण्यासाठी चालना देणाऱ्या आहेत.

त्याहीपुढे जात सध्याच्या व्यावसायिक केंद्राचे जर्मनीच्या व्यावसायिक केंद्रांप्रमाणे रूपांतरण केल्यास आधीपासून प्रस्थापित असलेल्या या केंद्रांच्या विकासाला चालना देईल. उदा. बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये स्मार्ट मोबिलिटी, डिजिटल अर्थव्यवस्था, स्मार्ट उर्जा आणि उपयुक्तता पायाभूत सुविधा यांच्या समावेशासह नवे मापदंड पार करण्याचे गुणधर्म असून तसे झाल्यास ते भारतातील सर्वात स्मार्ट व्यवसाय केंद्र म्हणून उदयास येऊ शकते.

महाराष्ट्रातील समुद्राशी संबंधित पायाभूत सुविधा ही विकासचा आणखी एक कहाणी आहे. राज्यामध्ये सर्वात मोठे कंटेनर हाताळणी पोर्ट, जेएनपीटी, ४८ नॉन- मेजर पोर्ट्स आहेत. मात्र, यापैकी केवळ १४ नॉन मेजर पोर्ट्स कार्गोची हाताळणी करतात. मजबूत औद्योगिक पाया आणि त्याला कुशल मनुष्यबळाची जोड दिल्यास महाराष्ट्रात समुद्री व्यापार क्षेत्राचा विकास करण्याची लक्षणीय क्षमता आहे. वाहतूक जाळ्याचा समावेश करण्यासाठी सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पोर्ट इंटरलिंक्स व समुद्री तसेच प्रादेशिक शिपिंगचा प्रसार यांच्या सहाय्याने महाराष्ट्र एक महत्त्वाचे आयात व निर्यात केंद्र बनू शकते.

संस्कृती व पर्यटन

महाराष्ट्राची ताकद येथे खोलवर रूजलेल्या परंपरांशी जोडलेली आहे. महाराष्ट्रातील लोकांनी त्यांची समृद्ध संस्कृती, कला व हस्तकला, लोकसंगीत, नृत्य आणि धार्मिक रीतींचा वारसा जतन केला आहे. हे लक्षात घेता समग्र विकासासाठी पर्यटन महत्त्वाचे ठरू शकते.

राज्यामध्ये विपुल वारसा स्थळे, बुद्धीस्ट गुहा आणि दीक्षाभूमीसारखी राष्ट्रीय महत्त्वाची ठिकाणे आहेत. काळजीपूर्वक नियोजन केल्यास पर्यटन स्थळे व शहरे, पर्यटकांच्या येण्यामुळे मुख्य केंद्रे बनतील व ते ठिकाण तसेच आजूबाजूच्या परिसरातील आर्थिक उपक्रमांना चालना मिळेल. समृद्धी कॉरिडॉरमध्ये शिर्डीचा समावेश केल्यास कनेक्टिव्हिटी आणि प्रस्तावित ग्रीनफील्ड विमानाचा विकास अधिक वेगवान होईल व त्यातून शाश्वत तसेच स्मार्ट विकास घडून येईल. यामुळे खऱ्या अर्थाने धार्मिक पर्यटन स्थळाची खरी गुणवत्ता समोर येईल.

वारसा स्थळे व सह्याद्रीचे अलौकिक सौंदर्य लाभलेल्या महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनाराही मिळाला असून त्याद्वारे देशात किनारपट्टी पर्यटनाचा नवा अध्याय लिहिता येईल. इटालियन रिव्हेरिया संकल्पना भारतात अद्याप आजमावण्यात आलेली नाही. स्वच्छसुंदर समुद्रकिनारे, किल्ले आणि किनारपट्टीवरील अलीबाग, रत्नागिरीसारखी शहरे महाराष्ट्रात भारतीय रिव्हेरिया तयार करण्यासाठी पूर्ण संचासह सज्ज असून त्यात रिसॉर्ट्स, पाण्यालगतीची रेस्टॉरंट्स आणि प्रोमोनेड्स, मरिन्स आणि बोट क्लब्ज, क्रुझ टर्मिनल्स यांचा समावेश केल्यास किनारपट्टी अर्थव्यवस्थेला बळकची मिळून भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारची परवडणारी व कमी खर्चिक पर्यटन यंत्रणा उदयास येईल.

शाश्वतता

२०२० पर्यंत भारत सर्वात तरुण राष्ट्र बनण्यासाठी सज्ज असून येथील कार्यरत लोकसंख्या ९६२ दशलक्ष असेल असा अंदाज आहे. महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येतील सध्याचा वाटा ९.२ टक्के असून एकंदरच मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे बांधकाम, रिटेल, बीएफएसआय, आयटी, आयटीईएस, उत्पादन अशा औद्योगिक क्षेत्रांतील मागणी वाढल्यास राज्याला मोठा फायदा होईल.

२०२२ पर्यंत ४५ दशलक्ष लोकांना रोजगारक्षम कौशल्यांनी परिपूर्ण करण्याच्या उद्देशासह महाराष्ट्र मानवी भांडवल आणि रोजगार संधी यांचे योग्य एकत्रीकरण करत आहे.

स्पष्टपणे पाहिल्यास, महाराष्ट्राचा संशोधन, पायाभूत सुविधा, संस्कृती, पर्यटन आणि टिकाऊपणा यांच्यावर आधारित असलेला विकास ईयूमधील जर्मनीच्या आघाडीच्या स्थानाप्रमाणे भारतात यशस्वी कहाणी लिहिण्याच्या मार्गावर आहे.