भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे दि. 8/10/2019 : पुणे शहर परिसरातील मतदान केंद्रांना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देवून पहाणी केली. सामान्य मतदारांसह दिव्यांग मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे स्टेशन परिसरातील साधु वासवानी चौकातील सेंट मीरा सेकंडरी स्कूलमधील मतदान केंद्रांला भेट दिली. त्यानंतर हडपसर येथील कै. लक्ष्मीबाई मगर प्राथमिक विद्यालयातील मतदार केंद्राला भेट दिली. दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी या ठिकाणी पहिल्या मजल्यावर असणाऱ्या चार मतदान कक्षाला तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यासाठी तात्पुर्त्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या मतदान कक्षाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल होण्याची शक्यता असल्याने त्याठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करून रॅम्प तयार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच याच परिसरातील ग्रीनवूड्स शाळेतील मतदान केंद्राची पाहणी करून रॅम्प दुरूस्त करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर बिबवेवाडी येथील प्रियदर्शनी प्राथमिक शाळेतील मतदान कक्षांची पहाणी केली. त्यानंतर टिळक रोडवरील एसपीएम शाळेतील मतदान केंद्रांची पहाणी केली. तसेच कसबा पेठेतील काही मतदान केंद्रांना भेटी देवून तेथील परिस्थितीची पहाणी केली, व योग्य त्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी छोट्या खोल्या आहेत, मतदारांना रांगेत उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही, ते मतदान कक्ष बदलण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, तहसिलदार तृप्ती कोलते, संबंधित क्षेत्रिय अधिकारी, स्थानिक गटस्तरीय अधिकारी (बिएलओ) उपस्थित होते.
