महावितरणच्या अस्तित्वासाठी आर्थिक स्थैर्य, दर्जेदार सेवा आवश्यकच – श्री. संजीव कुमार

Share this News:

मुंबई, दि. 11 सप्टेंबर 2017 : मक्तेदारी संपुष्टात येण्याचा स्पर्धात्मक काळ उभा ठाकला असताना भविष्यात महावितरणचे अस्तित्व टिकविण्यासाठी वीजबिलांच्या वसुलीतून आर्थिक स्थैर्य तसेच वीजग्राहकांना दर्जेदार सेवा देणे आवश्यक आहे, असे मत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने औरंगाबाद येथे तापडिया नाट्यमंदिरात कर्मचारी थेट संवाद कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. संजीव कुमार बोलत होते. ते म्हणाले, महावितरणच्या कामाचा ग्राहकसेवा हा केंद्रबिंदू आहे. मोबाईल व मोबाईल अ‍ॅप, वेबसाईटच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानातून महावितरणने जागतिक दर्जाची ‘ऑनलाईन’ ग्राहकसेवा सुरु केलेली आहे. तसेच महावितरण अंतर्गत नवीन वीजजोडणी, मीटर रिडींगसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर सुरु आहे. महावितरणमधील कर्मचार्‍यांसाठी किरकोळ रजेच्या अर्जापासून ते थेट पदोन्नतीपर्यंत सर्व प्रक्रिया पोर्टलद्वारे ‘ऑनलाईन’ झालेली आहे. त्याप्रमाणे कर्मचार्‍यांनीही वेगवान ग्राहकसेवेसाठी कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले, की महावितरण सद्यस्थितीत आर्थिक प्रतिकुलतेमधून जात आहे. रोखीने तोटा वाढत आहे. त्यामुळे आर्थिक स्थैर्यही महत्वाचे आहे. प्रत्येक युनिटची वसुली ही झालीच पाहिजे. थकबाकी, वीजचोरी हे दोन प्रकार महावितरणसाठी अतिशय घातक आहेत. राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीजचोरीविरोधी धडक मोहीम, थकीत वीजबिलांची वसुली, बिलींगमध्ये अचूकता यासाठी कायम दक्ष व तत्पर असले पाहिजे. तरच सध्याच्या प्रतिकूलतेवर मात करता येईल असेही श्री. संजीव कुमार यांनी सांगितले. मराठवाड्यात वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे. ते 15 टक्क्यांवर आणण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने व एकदिलाने आवश्यक उपाययोजना कठोरपणे कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात श्री. संजीव कुमार यांनी राज्यभरातून आलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांशी विविध मुद्‌द्यांवर संवाद साधला. वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष श्री. मोहन शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर सहव्यवस्थापकीय संचालक श्री. ओमप्रकाश बकोरिया, कार्यकारी संचालक श्री. शंकर शिंदे, मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर, संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. सी. एम. देशमुख, सरचिटणीस श्री. कृष्णा भोयर आदींची उपस्थिती होती.