योगा हा भाषणाचा नसून तो अनुभूतीचा विषय : पालकमंत्री गिरीश बापट
पुणे : योगा हा भाषणाचा विषय नसून तो अनुभूती घेण्याचा विषय आहे असे मत गुरुवारी पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारत सरकारचे आयुष मंत्रालय तसेच राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान पुणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम, प्रोफेसर डॉ.के सत्यलक्ष्मी,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री स्वत: या योगाच्या प्रात्यक्षिकात कार्यक्रमात सहभागी झाले होते.
बापट म्हणाले कि,लहान, मोठा, जात,धर्म असा कोणताही भेदभाव न करता योग सर्वांना करता येतो. योगामुळे मन आणि शरीर दोन्ही सुदृढ राहते. योग प्रसारासाठी पालकमंत्री म्हणून गेल्या तीन वर्षापासून प्रतिवर्षी ५० लाख रुपये देत आहे. भविष्यात यासाठी आणखी निधीची तरतूद करण्यात येईल. या निधीतून या विषयातील प्रशिक्षकांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन शिक्षकांना योगाचे धडे द्यावेत, यामुळे भावी पिढी सुदृढ होईल. योगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी केंद्र आणि राज्य सरकार कार्यरत आहे.
योगाला प्राचीन भारतापासून परंपरा आहे. ही देणगी आपण जगाला दिली आहे. योग करत असताना माणसाचे शरीर आणि मन एकत्र राहते. सकाळी थोडा वेळ जरी आपण योगाभ्यास केला तर आपला दिवस चांगला जातो. यामुळे शारीरिक दृष्ट्या आपण तंदृस्त राहतो. म्हणून योगाचे महत्व आहे. ज्या व्यक्ती नियमित योगाभ्यास करतात त्या व्यक्ती निरोगी रहातात. अनेक व्याधी योगाने बऱ्या होतात.लहानपणापासून मी योगाभ्यास करत आलो आहे. यामुळेच मला आज दैनंदिन कामकाज करताना थकवा येत नाही.
