बीड येथे झाले लोकार्पन सायबर विश्वातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त – पालकमंत्री पंकजा मुंडे

Share this News:

बीड, दि. 15 :-  सायबर विश्वातील गुन्हेगारी प्रकरणांचा तपास अधिक अत्याधुनिक  तंत्रज्ञान यंत्रसामुग्रीयुक्त सायबर लॅबमुळे अधिक सोपा होईल असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.

बीड येथील पोलीस अधिक्षक कार्यालयात अत्याधुनिक सायबर लॅब स्थापन करण्यात आली असून या लॅबचे आणि फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडीत, आमदार जयदत्त क्षीरसागर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सायबर गुन्हे कमी होतील आणि लॅबचा कमीतकमी वापर व्हावा अशी शुभेच्छा व्यक्त करुन पालकमंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा वाईट उपयोग करणाऱ्यांचा, व्हर्च्युअल जगात गैरवर्तणूक करणाऱ्यांचा प्रतिबंध करण्याची गरज निर्माण झाली आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला सुसज्ज व्हावे लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला तंत्रस्नेही केले असले तरी याचा दुरुपयोग रोखण्यासाठी अनेक आव्हाने आपल्या समोर उभी राहत आहेत. देशात तंत्रज्ञानाची मोठी क्रांती झाली आहे. घरोघरी प्रत्येकाकडे तंत्रज्ञान पोहोचले आहे. मोबाईलसारख्या तंत्रज्ञानाचा वापर खुप वाढत चालला आहे. चुटकीसरशी माहिती मिळवण्याची साधने अनेक झाली मात्र त्याच प्रमाणात सायबर गुन्हे वाढत चालले आहेत. सामान्य नागरिकांचे सायबर विश्वातील फसवणूकीपासून रक्षण करण्यासाठी पोलीस दल अधिक सक्षम होत असल्याबद्दल पालकमंत्री मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस दल सुसज्ज करण्यासाठी पुढाकार घेतला असून तरुणवर्गाने सायबर साधनांचा सुयोग्य वापर करावा आणि स्वत:चे रक्षण होण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे सांगून यानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शुभसंदेश पालकमंत्री मुंडे यांनी वाचून दाखविला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडीत म्हणाले की, देशभरात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असून त्याला रोखण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर उभे राहिले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा जेवढा जास्त उपयोग आहे तेवढाच त्याचा दुरुपयोगही होत आहे. या संदर्भातील गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. हा स्तुत्य उपक्रम आहे असेही ते म्हणाले.

आमदार जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानामुळे भौगोलिक सिमा लुप्त झाल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर अशांतता निर्माण करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी व आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी केला जात असल्यामुळे कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलाला अत्याधुनिक होणे आवश्यक आहे. यादृष्टीने पोलीस दलाने पाउले उचलली असल्याबद्दल त्यांनी कौतूक केले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, सायबर विश्वातील घडामोडी अमर्याद स्वरुपात घडत आहेत. पोलीस विभागाला अशा सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी फारशी अद्यावत साधनसामुग्री उपलब्ध नव्हती. मात्र शासनाने पुढाकार घेऊन अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अद्ययावत सायबर लॅब आणि फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन दिली आहे. बीड जिल्हा पोलीस प्रशासनाला आताचा लॅब आणि व्हॅनमुळे गुन्हे प्रकरणाच्या तपासामध्ये मोठी मदत होणार आहे.

पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आपल्या प्रास्ताविकाम सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि सोशल मिडियाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात वाढला आहे. त्याचप्रमाणे इंटरनेटमुळे निर्माण झालेल्या व्हर्च्युअल विश्वातील सायबर गुन्ह्यांचा बंदोबस्त करण्याची गरज पुढे आली आणि त्यादृष्टीने महाराष्ट्र पोलिसाने सायबर लॅबची संकल्पना राबविली आहे. या लॅबच्या माध्यमातून आता  सायबर गुन्हे शोधण्यासाठी व सिध्द करण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे सायबर विश्वातील गुन्हेगारी रोखण्यात यश मिळणार आहे.

            सायबर लॅबमुळे राज्यातील सर्व मुख्यालये एकमेकांच्या संपर्कात येवून सायबर संबंधाने तांत्रिक गुन्ह्यांची व माहितीची देवाणघेवाण होणार असून या अशा पध्दतीने घडलेले गुन्हे लवकर उघडकीस येण्यास मदत होणार आहे. नवीन प्रकल्पाअंतर्गत बीड येथील पोलीस अधिक्षक कार्यालयात सायबर लॅब आधुनिक पध्दतीने तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये नविन आधुनिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर पुरविले गेले आहेत. यामुळे सायबर कायद्याअंतर्गत होणारे हॅकींग, फिशींग, ऑनलाईन डेबिट कार्ड फसवणूक, क्रेडीट कार्ड फसवणूक, ऑनलाईन बँकींग फसवणूक, मोबाईल संबंधीचे गुन्हे उघडकीस येण्यास अत्यंत महत्वाची मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यात दाखल होणारे हरवलेल्या व्यक्ती, मालमत्ता व शरीराविरुध्दचे गुन्हे, इतर गंभीर गुन्हे देखील यापुर्वी सायबर लॅबच्या मदतीने उघडकीस आणण्यात येणार आहेत. अद्ययावत सायबर लॅबसाठी पुरविण्यात आलेल्या आधुनिक हार्डवेअर व सॉफ्टवेअरमुळे गुन्ह्यांची तात्काळ उकल करणे व आरोपींचा शोध घेण्यास मदत होणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

            यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील पुरस्कारप्राप्त पत्रकार वैभव स्वामी, अभिजित नखाते आणि संदीप बेदरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रसंगावधान राखून आपल्या आईचा जीव वाचविणाऱ्या प्रतिक ईश्वर धस या मुलाचाही सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उपअधिक्षक गणेश गावडे यांनी केले तर आभार अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्गी यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.