सैनिकांचा त्याग व अतुलनिय कामगिरीची माहिती जनतेपर्यंत पोहचणे गरजचे – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Share this News:

बीड, दि. 12 :- सीमेवर जवान देशाच्या रक्षण करीत असतात त्यामुळे आपण सुरक्षित आणि शांततेमध्ये जीवन जगू शकतो. देशाचे रक्षण करताना सैनिकांचा त्याग आणि त्यांची अतुलनिय कामगिरी यातून आजच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळते त्यामुळे अशी माहिती विविध उपक्रमांद्वारे जनतेपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे मत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात 41 राष्ट्रीय रायफल (मराठा लाईट इन्फ्रंट्री)  येथे कार्यरत असलेले शिपाई गणेश डोके यांचा सेनामेडल मिळल्याबद्दल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या गौरव पुरस्कार योजनेंतर्गत 5 लाख रुपयांचा धनादेश आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त  पोलीस अधिक्षक वैभव कल्लुबर्मे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुभाष ढोरजकर, ईसीएचएस प्रभारी अधिकारी विंग कमांडर  चेट्टी सिधांन,  ऑनररी कॅप्टन रामलिंग माळी , ऑनररी कॅप्टन नामदेव काळे   आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, शिपाई गणेश डोके यांच्या सारखे वीर जवान बीड जिल्हयात असणे ही आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद गोष्ट आहे. सैनिकांचा त्याग आणि बलिदान यांची माहिती विविध उपक्रमांद्वारे जनतेपर्यंत पोहचविल्यास आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल तसेच तरुण लष्करामध्ये भरती होण्यासाठी प्रवृत्त होतील. गणेश डोके यांनी केलेली कामगिरी अतुलनिय असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम यांनी गणेश डोके यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बीड जिल्हयाच्या आष्टी तालुक्यातील मातकुली गावाचे रहिवासी असलेले शिपाई गणेश डोके हे  41 राष्ट्रीय रायफल्स, कमांडींग ऑफीसर  कर्नल संतोष महाडीक  यांचे अंगरक्षक म्हणून काम करीत होते.  सर्च ऑपरेशन गुरदाजी नारमध्ये कार्यरत असताना गुरदाजी नार गावाजवळ अतिरेक्यांनी मोठया प्रमाणात गोळीबारी चालु केली आणि ऑपरेशन लिडर कमांडींग ऑफीसर तसेच  सेनामेडल व शौर्यचक्राने गौरविले गेलेले  कर्नल संतोष महाडीक यांना घेरले असता शिपाई  गणेश डोके यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आतंकवाद्यांचा म्होरक्याकडे धाव घेऊन त्यांच्यावर गोळीबार करुन त्यांला ठार मारले व त्याच्याकडील एके 47 रायफल व युध्दसामग्री घेऊन स्वत:च्या ऑपरेशन लिडरचा जीव वाचविला. शिपाई गणेश डोके यांच्या अदम्य साहस व उच्चकोटीच्या शौर्याबद्दल त्यांना महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2015 रोजी  सेनामेडल देवून गौरविण्यात आले होते अशी माहिती यावेळी बोलताना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुभाष ढोरजकर यांनी दिली. या कार्यक्रमात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील महिंद संगय, शेख जमील, आर.व्ही. बांगर, कैलास जाधव यांची उपस्थिती होती.