दस-याला श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी अर्पण

just pune things app
Share this News:

पुणे 8/10/2019 : सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून दस-यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे १६ किलो वजनाची ही साडी आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी ही साडी नेसविण्यात येते. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी मान्यवर उपस्थित होते.

राजकुमार अग्रवाल म्हणाले, दक्षिण भारतातील कारागिरांनी ८ वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली असून श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे ९ वे वर्ष आहे. दस-याच्या दिवशी हळदी-कुंकू व ओटीच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाचा समारोप झाला.

नवरात्र उत्सवात यंदा धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे नानाविध उपक्रम राबविण्यात आले. धार्मिक कार्यक्रमांसोबतच महिला पोलीस, दिव्यांग शिक्षीका, महिला सफाई कामगार, वीरमाता-वीरपत्नी, महिला खेळाडू, अंध महिला वृद्धाश्रम, अग्निशामक दलातील जवान, दिव्यांग सैनिक सन्मान सोहळा असे सामाजिक कार्यक्रम देखील मंदिरात आयोजित करण्यात आले होते. दस-यानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठया प्रमाणात रांगा लावल्या होत्या.