Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

17 वे साहित्यिक कलावंत संमेलन 24 आणि 25 डिसेंबर रोजीः विविध कार्यक्रमांची पर्वणी

पुणे प्रतिनिधी, विशाल मुंदडा
येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा दिनांक 24 आणि 25 डिसेंबर रोजी साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या 17 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात रसिकांना विविध कार्यक्रमांची पर्वणी मिळणार असून या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक आणि साहित्यिक डॉ. निशिकांत मिरजकर भूषविणार आहेत, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना दिलीप बराटे म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार दिनांक 24 आणि सोमवार दिनांक 25 डिसेंबर 2017 रोजी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे येथे हे संमेलन होणार आहे. यानिमित्त आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 (साडेनऊ) वाजता, प्राचार्य रावसाहेब गुजर यांच्या हस्ते, तर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10.00 (दहा) वाजता पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी 10.30 (साडेदहा) वाजता 17 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन सिंबायोसिस शिक्षण समुहाचे संस्थापक-अध्यक्ष पद्मभूषण डॉ. शां.ब.मुजुमदार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी 17व्साया हित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक आणि साहित्यिक डॉ. निशिकांत मिरजकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि सरहद, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता, कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त विंदा दर्शन हा विशेष कार्यक्रम प्रा.जयश्री करंदीकर-काळे सादर करणार आहेत. दुपारी 4.00 (चार) वाजता होणा-या सांस्कृतिक राष्ट्रवाद या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षस्थान माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत. या परिसंवादात तुषार गांधी, प्रा.डॉ. शशिकला राव आणि संजय आवटे सहभागी होणार आहेत. तर संध्याकाळी 6.00 (सहा) वाजता, गायिका चैत्राली अभ्यंकर यांचा जीवनगाणे हा कार्यक्रम होईल. रात्री 8.00 (आठ) वाजता कवी एेश्वर्य पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कवी संमेलनात डॉ. अविनाश सांगोलेकर, दीपक करंदीकर, रामदास केदार, अनिल दीक्षित, गजानन सोनोने, भालचंद्र कोळपकर, बापूसाहेब पिंगळे, मनीषा घेवडे, विमल वाणी, धनंजय सोलंकर आणि सुनील जवंजाळ आदी सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या दुस-या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 25 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 11.00 (अकरा) वाजता सामाजिक परिवर्तन आणि आजचे मराठी साहित्य या विषयावर उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यामध्ये राजन खान, इंदुमती जोंधळे आणि विजय बाविस्कर भाग घेणार आहेत. दुपारी 2.00 (दोन) वाजता, ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांची प्रकट मुलाखत होईल.
दुपारी 4.00 (चार) वाजता, यंदाच्या वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्काराचे वितरण डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचा कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांना, तर साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी रुपये अकरा हजार असे स्व. रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणा-या या पुरस्काराचे स्वरुप आहे.
संध्याकाळी 6.00 (सहा) वाजता प्रा. आप्पासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कथाकथन कार्यक्रमात माधव पाटील, विलास मोरे आणि सतीश सुरवसे सहभागी होणार आहेत. तर रात्री 8.00 (आठ) वाजता, कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. त्यामध्ये संगीता बर्वे, रमण रणदिवे, भरत दौंडकर, नारायण पुरी, अंकुश आरेकर, प्रदीप पाटील, राजन लाखे, ज्ञानेश्वर शेंडे, वर्षा तोडमल, अश्लेषा महाजन, आबा महाजन, अस्मिता जोगदंड-चांदणे आणि हनुमंत चांदगुडे सहभागी होणार आहेत.
विविध साहित्यिक आणि कलावंतांचा सहभाग असलेल्या आणि बहुरंगी कार्यक्रमांची पर्वणी असलेल्या या संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे यांनी यावेळी केले.