झोपडपट्टी पुनर्वसनात बोगसगिरी; आयुक्त राजीव जाधव यांची कबुली

Share this News:

· नगरसेविका सीमा सावळे यांनी आणले होते उघडकीस
· ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, कारकुनाची खातेनिहाय चौकशी सुरु

पिंपरी, (दि. २९) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गतराबविलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात भ्रष्टाचार, अनागोंदी आणि खाबुगिरी झाल्याचे नगरसेविका सीमा सावळेयांनी उघडकीस आणले होते. त्यावर आता महापालिका प्रशासनानेही शिक्कामोर्तब केले आहे. निगडी, सेक्टर क्रमांक२२ मधील स्कीम झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र लाभार्थ्यांना बोगस आणि बनावट जन्मदाखले देऊन घरे मिळविल्याचे नगरसेविका सावळे यांनी पुराव्यासह सिद्ध केले होते. ते खरे असल्याची धक्कादायक कबुली आयुक्तराजीव जाधव यांनी दिली आहे. या बोगसगिरी प्रकरणी जन्मनोंदणी उपनिबंधक म्हणून ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.गोविंद तळपाडे, कारकुन प्रवीण उघडे यांची खातेनिहाय चौकशीही त्यांनी सुरु केली आहे. झोपडपट्टी विरहीत शहर प्रकल्पांतर्गत पिंपरी महापालिकेने १८ हजार ३२ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे काम हाती घेतले. त्याअंतर्गत निगडी – सेक्टर २२, अजंठानगर, उद्योगनगर, वेताळनगर मिलिंदनगर, विठ्ठलनगर, याझोपडपट्टयांमधील ८ हजार ४५२ झोपडीधारकांचे आणि रस्तारुंदीकरण बाधीत, रेल्वे मार्गानजिकच्या, पूरबाधित अशारहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे ठरले. केंद्र सरकारने या प्रकल्पांसाठी १६६ कोटी २६ लाख आणि राज्य सरकारने ९९ कोटी २९ लाख रुपयांचे अनुदान दिले. या बांधकामावर आजतागायत ४९५ कोटी ७७ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, हरितपट्टा, पूरनियंत्रण रेषा आणि लष्कराच्या संरचित क्षेत्रात (रेडझोन) झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविणारीपिंपरी-चिंचवड महापालिका पुरती कचाट्यात सापडली आहे. सर्व नियम, कायदेकानून धाब्यावर बसवून राबविण्यातआलेल्या या पुनर्वसन प्रकल्पाचे कोर्टकज्जे सुरु आहेत. केवळ बांधकामातच नव्हे तर हरेक कामात खाबुगिरीकरणाऱ्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी झोपडपट्टीधारकांच्या नावाने आपले सगेसोयरे, मित्रमंडळीसाठी घरकुले बळकावली. राजकीय वजन आणि थैल्या वापरुन खऱ्या लाभार्थ्यांऐवजी बोगस लाभार्थ्यांना घरकुले मिळवून दिली.त्यासाठी खोटीनाटी कागदपत्रे तयार केली. या सर्व बोगसगिरीचा नगरसेविका सीमा सावळे यांनी भांडाफोड केला. एकट्या निगडी,ओटास्कीम येथील झोपडपट्टीपुनर्वसन प्रकल्पात १२१ बोगस लाभार्थी आढळल्याचे पुरावे त्यांनी सादर केले. सरकारची फसवणूक करणाऱ्यांवरफौजदारी करा, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली. कागदोपत्री पुरावेच सादर केल्याने तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकरपरदेशी कमालीचे हादरले. त्यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापरिक्षक आणि सहायक आयुक्त (झोपु)यांची त्रिसदस्यीय समिती गठीत केली. तथापि, डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली होताच त्रिसदस्यीय समितीचे कामकाजथंडावले. परंतु, नगरसेविका सीमा सावळे यांनी सतत दोन वर्षे पाठपुरावा केल्याने या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे सादर केला. या अहवालात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले. त्याचा पहिला बळी वैद्यकीय विभागातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद तळपाडे, कारकुन प्रवीण उघडेठरले आहेत. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या जन्म दाखल्यांवरील पत्त्यामध्ये उपनिबंधक डॉ. गोविंद तळपाडे, कारकुन प्रवीण उघडेयांनी परस्पर बदल केला. दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविल्यावर त्यांनी खुलासे सादर केले. तथापि त्यांचे खुलासे असमाधानकारक असल्याचा निष्कर्ष आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी काढला. तसेचत्यांच्यावर जन्म-मृत्यू नोंदणीमधील अनियमिततेबाबत नियमावधीन कारवाई करावी, अशी शिफारस केली. त्यानुसार, डॉ. गोविंद तळपाडे यांनी केलेला अधिकारांचा दुरुपयोग आणि कारकुन प्रविण उघडे यांनी वाईट हेतूने केलेलेकृत्य यांची गंभीर दखल घेत दोघांचीही खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी दिले आहेत.