दारुबंदीनंतरच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष्य – पारोमिता गोस्वामी

Share this News:
  • पारोमिता गोस्वामी आणि प्रमोद उदार यांना डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार प्रदान

पुणे, फेब्रुवारी ७ : महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेतला, हा निर्णय स्वागतार्ह्य आहेच, मात्र या निर्णयानंतर समोर उभ्या ठाकलेल्या प्रश्नांकडे सरकारने सोयीने दुर्लक्ष्य केले असल्याची खंत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या चळवळीत अग्रसर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी आज व्यक्त केली. अनिता अवचट फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार यावर्षी पारोमिता गोस्वामी आणि प्रमोद उदार यांना आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शैला दाभोलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार पारोमिता गोस्वामी आणि प्रमोद उदार यांना प्रदान करण्यात आला. ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’चे अध्यक्ष डॉ. ए. पी. कुलकर्णी, सचिव डॉ. अनिल अवचट, उपसंचालिका मुक्ता पुणतांबेकर, विश्वस्त डॉ. आनंद नाडकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुक्तांगण व्यसनमुक्ती परिवाराच्या वतीने दरवर्षी व्यसनमुक्तीशी सामना करणा-या, सामाजिक प्रश्नांसाठी लढणा-या व्यक्तींना आणि संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे हे एकोणविसावे वर्ष असून आज चंद्रपूर जिल्ह्यात श्रमिक एल्गार संस्थेच्या माध्यमातून दारूबंदीसाठी लढा देणा-या पारोमिता गोस्वामी आणि स्वत: व्यसनातून बाहेर पडून गेली २५ वर्षे अनेकांना व्यसनमुक्तीसाठी मदत करणा-या प्रमोद उदार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच ‘आनंदयात्री’ या मुक्तांगणच्या नियतकालिकाचे प्रकाशनही आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना पारोमिता गोस्वामी म्हणाल्या, ”केवळ दारूबंदी जाहीर करून दारूबंदीचा प्रश्न सुटला असे होणार नाही. आज या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अधिक कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अवैध दारूचा पुरवठा रोखणे आणि या भागात व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे ही सरकार समोरील आव्हाने आहेत.”

आज सरकार ‘ताडोबा फेस्टिव्हल’ सारख्या उपक्रमांमधून शहरातील नागरिकांना जंगलांकडे आकर्षित करते आहे, मात्र आदिवासींना स्वत:च्या जमिनी, सरपण, वनौषधी यांपासून दूर लोटत आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

आज समाजात व्यसनाला प्रतिष्ठा, दिमाख, गौरव समजले जाते, ही मानसिकता बदलत व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, असे मत यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शैला दाभोलकर यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ आनंद नाडकर्णी यांनी पारोमिता गोस्वामी आणि प्रमोद उदार यांचे कार्य मुलाखतीच्या स्वरूपात सर्वांसमोर मांडले.