महिला विनयभंगाच्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधानपरिषदेत आक्रमक

Share this News:

मुंबई – दि.29 : भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याने महिला कार्यकर्तीचा केलेला अपमान व विनयभंगाच्या विरोधात आज विरोधी पक्षांनी २८९ अन्वयेद्वारे विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव आणून चर्चा करण्याची मागणी केली. हा प्रस्ताव सभापतींनी फेटाळून लावला. सरकारने स्वतःहून गुन्हा दाखल करणे योग्य होणार नाही. मात्र सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेता, त्या पिडीत महिलेचा जबाब एका वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून इन कॅमेरा घ्यावा. तसेच सरकारने शुक्रवारी त्याबाबतीत निवेदन द्यावे, असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सरकारला दिले.

भाजपच्या एका महिला कार्यकर्तीचा भाजप युवा मोर्चाचा मुंबई अध्यक्ष विनयभंग करतो, ही चांगली गोष्ट नाही. एका बाजूला स्वतःच्या पक्षातल्या महिलांना जगणं मुश्किल होईल, अशी वागणूक दिली जात असताना दुसऱ्या बाजूला इतर पक्षाच्या महिलांनी याविरोधात आवाज उठवल्यावर त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. काल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना निवेदन द्यायला गेल्या असताना भाजप कार्यकर्त्यांच्या जमावाने त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेत घोषणाबाजी केली. तसेच पोलीस बळाचा वापर यावेळी केला गेला. एसीपी संजय कदम यांनी तर, ‘अंगावर हात टाकण्याची वाट पाहत आहात काय? वेळ न घेता कशाला इथे आलात‘, अशी धमकी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिली. स्थगन प्रस्तावावर आपले मत नोंदवताना विरोधी पक्षनेतेधनंजय मुंडे यांनी या घटनेची निंदा केली.

भाजप युवा मोर्चाचा मुंबई अध्यक्ष गणेश पांडे याचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे. तरच समाजासमोर एक उदाहरण निर्माण होईल, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी सभागृहात व्यक्त केली. वर्मा कमिशनने महिला सुरक्षेच्या बाबतीत जे कायदे केले आहेत, ते फक्त भिंतीवर लावण्यासाठी केले गेले आहेत का? असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. पांडेने ज्या प्रकारे त्या महिलेला त्रास दिला तो पाहता त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. शासनाने सुमोटोदाखल करुन त्याला अटक केली पाहिजे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी याचा निषेध केला असताना पोलीस बळाचा वापर करुन विरोध दाबला जातोय. याचा अर्थ सरकारने अघोषित आणीबाणी चालू केली आहे का? अशी टीकाही विद्या चव्हाण यांनी केली.

दरम्यान, काँग्रेसच्या आमदार दिप्ती चौधरी यांनी विधानपरिषदेत हा स्थगन प्रस्ताव दाखल केला होता. त्यांनी पिडित महिलेच्या पत्राचा दाखला देत त्यात आरोपीने उच्चारलेल्या मराठणया शब्दावर तीव्र आक्षेप घेतला. हा त्या एका महिलेचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी महिलांचा अपमान असून पांडे सारख्या विकृत प्रवृत्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.