मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजपचा डाव – निरंजन डावखरे
मुंबई – दि.4 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताबाबत केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.निरंजन डावखरे यांनी सडेतोड टीका केली आहे. विधानभवन परिसरात सर्व आमदारांना राष्ट्रध्वज लावून निरंजन डावखरे यांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आपल्या देशात तिरंगा आणि ‘जन गण मन‘ या राष्ट्रगीताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र आरएसएस या बाबीला छेद देण्याचा प्रयत्न करत असून तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी ‘भगवा राष्ट्रध्वज‘ आणि ‘जन गण मन‘ ऐवजी ‘वंदे मातरम‘ हे गीत आणून राष्ट्राचे भगवेकरण करू पाहत आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून देशात असंतोषाचे वातावरण पसरविण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप डावखरे यांनी केलाय. राज्यातील मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा खेळ सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांसंबंधी डावखरे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. पण त्याबाबत शासनाने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही. अशा परिस्थितीत असे आक्षेपार्ह वक्तव्य करून दुष्काळाचा ज्वलंत मुद्दा बाजूला टाकण्यात येत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. देशातील प्रत्येक नागरिकाला आपपल्या पद्धतीने देशप्रेम प्रकट करण्याचा अधिकार आहे, असेही डावखरे यांनी स्पष्ट केले.