त्या ड्रेनेजमधे अडकलेल्या बकरीची दलाच्या जवानांकडून सुखरूप सुटका

पुणे – वेळ सकाळी ६:३०ची… अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात सिंहगड रोडवर सनसिटीजवळ बकरी ड्रेनेजमधे पडल्याची वर्दि मिळते… अवघ्या ३/४ मिनिटातच सिंहगड अग्निशमन केंद्राचे जवान दाखल होतात आणि मग सुरु होते प्रयत्नांची झुंज… त्या मुक्या जिवाला वाचवण्याची शर्त….

आज सकाळी सनसिटीजवळ एक बकरी ड्रेनेजमधे पडल्याची घटना घडली. त्यावेळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होताच त्यांनी पाहिले की , खोल ड्रेनेजमधे एक बकरी पडली असून ती बाहेर येण्याकरिता कासावीस झाली अाहे. त्याचवेळी जवान शिवाजी आटोळे व प्रमोद मरळ यांनी मोठ्या धाडसाने त्या ड्रेनेजमधे उतरून त्या बकरीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. परंतू , ती बकरी त्यांना घाबरून पुढेपुढे सरकत होती. त्यावेळी जवानांनी युक्ती लढवत तिला खाद्य म्हणून शेवडी मागवली व जवान प्रमोद मरळ यांनी आतमधे सरपटत जाउन तिला खायला देण्याचा प्रयत्न करताच तीदेखील त्यांच्याजवळ आली. बस मग काय , ती जवळ येताच जवानांनी समयसुचकता दाखवत तिला सुखरुप बाहेर काढून एका मुक्या जिवाचे प्राण वाचिवले.

या रेस्क्यू ऑपरेशनकरिता तब्बल दिड ते दोन तासाचा अवधी लागला. पण जवानांच्या हुशारीमुळे तिला सुखरूप  बाहेर काढण्यात यश आले. या विषेश कामगिरीमधे दलाचे चालक नितीन भुजबळ व जवान प्रमोद मरळ , शिवाजी आटोळे , रोहिदास दुधाने , विलास घडशी , उमेश शिंदे , भरत गोगावले , सुनिल दिवाडकर यांनी सहभाग घेतला.