कलाकाराने समाजाभिमुख असावे- पं. शौनक अभिषेकी

Share this News:
  • पं. शौनक अभिषेकी यांना ‘पं. संगमेश्वर गुरव स्मृती सन्मान’ पुरस्कार प्रदान
  • पं. संगमेश्वर गुरव यांच्या स्मृतीदिना निमित्ताने आयोजित संगीत महोत्सवाची सांगता

पुणे, ८ मे २०१६:  संगीत हा आयुष्यातील एक प्रयोगाच आहे आणि या प्रयोगात कलाकाराला घडविण्याचे काम हा समाज करत असतो त्यामुळे कलाकाराने नेहमी समाजाभिमुख असले पाहिजे. याबरोबर संगीताची जपवणूक व वाढ होणे आज गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी यांनी केले. पुण्यातील कलानुभव चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवाच्या सांगते प्रसंगी अभिषेकी बोलत होते.

किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पं. संगमेश्वर गुरव यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामध्ये आज पं. संगमेश्वर गुरव स्मृती सन्मान पुरस्कार प्रदान करत पं. शौनक अभिषेकी यांना गौरविण्यात आले.शाल, पगडी, मानचिन्ह, मानपत्र आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून प्रसिद्ध नृत्यांगना सुचित्रा भिडे चापेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार अभिषेकी यांना प्रदान करण्यात आला.

कलानुभव चॅरीटेबल ट्रस्टच्या विश्वस्त भारती ब-हाटे, सीड इन्फोटेकचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र ब-हाटे, पं. कैवाल्यकुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून आज पं कैवल्यकुमार व पं शौनक अभिषेकी यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता केली.

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना शौनक अभिषेकी म्हणाले, “ संगीतात काही अवतारी लोकं होऊन गेली, पं संगमेश्वर गुरुजी हे त्यातीलच एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. आमच्यासाठी ते या क्षेत्रातील हिमालय आहेत. त्यांच्या नावाने पुरकार मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. याबरोबरच शास्त्रीय संगीतात ‘कलानुभव’ कडून होणारे कार्य हे अवर्णनीय आहे.”

हा पुरस्कार मिळण्याचे श्रेय हे माझ्या गुरुंबरोबरच माझ्या आईचेही आहे, असे सांगत शौनक यांनी आपल्या जडणघडणीत आईचे योगदान स्पष्ट केले.

अभिजात कलांमध्ये वारसा आणि परंपरा या महत्वाच्या आहेतच पण याबरोबर कलेची साधनाही तितकीच महत्वाची आहे आणि या महोत्सवात या सर्व कलांचा संगम पहायला मिळाला असे मत यावेळी सुचिता भिडे चापेकर यांनी व्यक्त केले. यावेळी सुचेताताई आणि बाळा दांडेकर यांनी पं संगमेश्वर गुरूजींच्या आठवणींना उजाळा दिला.

आज महोत्सवाच्या दुस-या दिवशी शौनक अभिषेकी यांनी आपल्या गायकीने सुरवात केली. यावेळी त्यांनी राग रावती व धृत मध्ये ‘आस लागी तुम्हारे चरण की…’ व ‘केहत पिया…’ या बंदिशी सादर केल्या. त्रिवेणी रागात त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. यानंतर पं कैवल्यकुमार यांच्या बहारदार गायकीने झाली त्यांनी यावेळी यमन राग सादर करत उपस्थितांची माने जिंकली. या दोन्ही गायकांना प्रशांत पांडव (तबला) व डॉ. सुधांशू कुलकर्णी (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

कला क्षेत्रातील तरुण वर्गाला मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कलानुभव ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून केवळ संगीतच नव्हे तर इतरही अनेक कलांचा नजराणा ट्रस्टच्या माध्यमातून रसिकांन समोर सादर करण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे.