ABVP strike at Fergusson College
अभाविपच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘धरणे आंदोलनाला’ यश
(पुणे-३०)- फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांच्याविरोधात व विद्यार्थ्यांच्या विविध रास्त मागण्यांसाठी अभाविप फर्ग्युसन महाविद्यालय शाखेने धरणे आंदोलन केले. दिनांक ३ मार्च २०१७ पासून फर्ग्युसन महाविद्यालयात अभाविपच्या स्थानिक महाविद्यालय शाखेने सलग ४ दिवस आंदोलन करून हे यश मिळवले.
फर्ग्युसन महाविद्यालयातील विविध समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत होते. यामध्ये मेस मधील अन्नाचा दर्जा सुधारावा, मेसमध्ये विद्यार्थ्यांना किमान आठवड्यातून एकदा तत्सम आहार (Non-veg) दिला जावे, महाविद्यालयात विद्यार्थिनींना २४ तास स्वच्छतागृहे उपलब्ध असावी, महाविद्यालयात व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्याचे मशीनमध्ये पाणी उपलब्ध व्हावे, महाविद्यालयात कचराकुंडीची व्यवस्था व्हावी, तसेच आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना Wi-Fi ची सुविधा उपलब्धता असावी, विद्यार्थ्यांना निःशुल्क पार्किंग ची व्यवस्था असावी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त फीस न घेता राहण्याची सुविधा असावी अश्या मागण्यांचा यामध्ये समावेश होता. या मागण्यांपैकी महाविद्यालयात विद्यार्थिनींना २४ तास स्वच्छतागृहे असावी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना Wi-Fi ची सुविधा मिळावी या मागण्या प्रशासनाने तात्काळ मान्य केल्या व अन्य मागण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष श्री. शरद कुंटे यांनी आज दि. ६ मार्च २०१७ ला सकाळी ११ वाजता, अभाविपचे कार्यकर्ते करत असलेल्या धरणे आंदोलन स्थळी येऊन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. शरद कुंटे यांनी वरील सर्व मागण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पेढे वाटुन ह्या आंदोलनातुन मिळालेले यश साजरे करण्यात आले.