पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना रोखण्यास युद्धपातळीवर सतर्कता – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनाला आदेश
पुणे –
कोंढवा येथील भिंत दुर्घटनेसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी युद्धपातळीवर सतर्कता बाळगण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी प्रशासनाला दिले.
कोंढवा दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होईलच. पण त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊच नयेत, यासाठी अधिक सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. अस्तित्वात असलेल्या नियमावलीची चोख अंमलबजावणी करण्यास आमचे प्राधान्य राहील, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
कोंढवा दुर्घटनेनंतर परिस्थितीचा त्यांनी रविवारी पुन्हा आढावा घेतला. तत्पूर्वी, या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी शनिवारी सकाळी आपला दौरा अर्धवट सोडून तातडीने पुण्याकडे धाव घेतली. बचाव कार्य, जखमींवर उपचार, मदत निधीचे त्वरित वितरण आणि मृतदेह कामगारांच्या बिहारमधील मूळगावी पाठवण्याच्या सर्व कार्यवाहीवर पालकमंत्री पाटील यांनी व्यक्तिशः देखरेख ठेवली. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले.
दाट लोकवस्ती आणि नागरी वस्तीतील अशा प्रकारच्या बांधकामासाठीच्या सुरक्षितता तातडीने तपासण्यात येईल. मजुरांच्या सुरक्षेविषयी शहर व परिसरात सुरू असलेल्या बांधकामांची तातडीने पाहणी करून संबंधित विकासकाला त्या संदर्भातील आदेश देण्यात येतील. सुरू असलेल्या प्रत्येक बांधकामाच्या सेफ्टी ऑडिटचा आढावा घेऊन त्यामध्ये कोणत्या त्रुटी आढळल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असा आदेश पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिला.
धोकादायक वाड्यांच्या धर्तीवरच शहर व परिसरातील कच्च्या झोपड्या आणि तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कच्च्या घरांची व दाटीवाटीच्या परिसरातील वस्त्यांची तातडीने पाहणी करून त्यांना पावसाळ्यात कोणता धोका तर नाही ना याचा सुद्धा युद्धपातळीवर आढावा घ्यावा, असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले.