प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनासंदर्भात समर्पित भावनेने काम करावे- – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Share this News:

पुणे दि.15 : – कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थिती हे आपल्यावर आलेले मोठे संकट आहे, याचा मुकाबला धैर्याने करावयाचा आहे, त्याकरीता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी सजग रहावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केले.

कोरोना संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत विधानभवन येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त् आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, आरोग्य उप संचालक डॉ. संजय देशमुख, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, या आपद्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनातील सर्वच घटकांनी मार्गदर्शक सूचनांनुसार आपापली जबाबदारी पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. सर्वच शासकीय अधिकारी कर्मचा-यांनी स्वत:बरोबरच कुटुंबाची सुध्दा काळजी घ्यावी. याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याला महत्व द्यावे. आवश्यक् त्याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल. नागरिकांनी काय करावे अथवा काय करु नये, याबाबत प्रशासनाच्या वतीने सर्वांना अवगत करण्यात येणार आहे. परंतु आपापल्या सेवा बजावताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. परिस्थितीजन्य निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक यंत्रणांनी वेळीच त्यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार कार्यवाही करून प्रशासनाला अवगत करावे, अशा प्रकारच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, कोरोना विषाणू परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी मिशनमोडमध्ये काम करणे गरजेचे आहे. याबाबत प्रत्येकाला जबाबदारी नेमून देण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्वच संशयितांची माहिती घेवून त्याबाबतचे निर्णय घेण्यात यावेत, तसेच या काळात वैद्यकीय विभागांना प्रशासकीय सहकार्य करावे, यामध्ये वैद्यकीय अधिका-यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येकाला जी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यानुसार त्यांनी वेळेवर आपली जबाबदारी पार पाडावी. आवश्यक तेथे मागणीनुसार रुग्णवाहिका सेवा सुसज्ज ठेवण्यात याव्यात, वैद्यकीय साधनसामग्रीच्या मागणी व साठ्याबाबत आढावा घेण्यात यावा, वैद्यकीय विभागांना आवश्यक तेथे पोलीस विभागाने सहकार्य करावे. या कालावधीमध्ये लग्नसमारंभ व इतर समारंभाबाबत समुपदेशन करण्यात यावे. रहिवासी सोसायट्यांमध्ये नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा प्रकारच्या सूचना केल्या.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनीही महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात येणा-या जनजागृती व कार्यवाहीबाबत माहिती दिली. तसेच प्रशासकीय विभागांकडून कोणत्या प्रकारची काळजी घेण्यात यावी हे सांगितले. रहिवासी सोसायटींच्या पदाधिका-यांनी आपल्या परिसरातील स्वच्छतेबाबत सतर्क रहावे तसेच याकाळात संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे सांगितले.