मद्य विक्री अनुज्ञप्ती 31 मार्चपर्यंत बंद – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि. 20 : पुणे जिल्ह्यातील सर्व एफएल- 2 (वाईन शॉप)/ एफएलबिअर-2 (बिअर शॉपी)/ एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई (बिअरबार)/ ई -2/ एफएल-4 (कायमस्वरूपी क्लब अनुज्ञप्ती) एफएल-4 (तात्पूरती क्लब अनुज्ञप्ती) / सीएल- 3 (देशी दारू किरकोळ विक्री ) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 31 मार्च 2020 अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी देशात सर्वत्र प्रवास करत आहेत. असे प्रवासी पुणे जिल्हयात परदेश प्रवास करून आलेले आहेत व त्यातील बरेच प्रवासी परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोरोनो विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे या बाबी टाळणे आवश्यक आहे.
या विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 मधील कलम 30 (2) (v) व (xviii) अन्वये तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम-142 नुसार पुणे जिल्ह्यातील सर्व एफएल- 2 (वाईन शॉप)/ एफएलबिअर-2 (बिअर शॉपी)/ एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई (बिअरबार)/ ई -2/ एफएल-4 (कायमस्वरूपी क्लब अनुज्ञप्ती) एफएल-4 (तात्पूरती क्लब अनुज्ञप्ती) / सीएल- 3 (देशी दारू किरकोळ विक्री ) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार दि. 20 मार्च ते 31 मार्च 2020 अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.
आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमन, 1949 व त्या अंतर्गत असलेल्या कलम व नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असेही श्री. राम यांनी आदेशात म्हटले आहे.