गर्दीत जाणे टाळूया.. कोरोनावर मात करुया! : वृषाली पाटील

Share this News:

पुणे, 21/03/2020 : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण ऑफिस किंवा कामाच्या निमित्तानं सकाळी घर सोडलं की परत रात्रीच्या अंधारातच घरी परततो.. त्यातील किमान 6 तासांची झोप वगळली, तर जेमतेम सकाळचे 2-3 तास आणि रात्रीचे 2 तासच कुटुंबाच्या वाट्याला येतात..! या 4-5 तासात पण घरातील कामे, घरासाठीच्या आवश्यक साधनसामुग्रीच्या खरेदीसाठी बराच वेळ खर्च होतो. यातून मिळालेला तासभराचा वेळ आपण कुटुंबियांना, आपल्या मुलांना देतो.. त्यावेळेत पण टीव्ही, मोबाईल.. व्हाट्स अँप.. आणि सोशल मीडियाचा अडथळा आहेच..! ज्या कुटुंबियांसाठी.. आपल्या मुलांसाठी.. आपण दररोज ही धावपळ करतोय.. त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, सुख-दुःखांची देवाणघेवाण करण्यासाठी, गाणी-गोष्टी ऐकण्यासाठी.. किती वेळ देतो..? खरंच विचार करण्यासारखी बाब आहे..! आजवर कामाच्या गडबडीत हे शक्य झालं नाही, पण आता गरज निर्माण झालीय…. ‘कोरोना’च्या प्रतिबंधासाठी गर्दीत जाणं टाळण्याची..! थोडे दिवस घरीच थांबण्याची..! घराला वेळ देण्याची..आता गरज निर्माण झालीय..!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकानं घरी थांबायला हवंय.. मुख्यमंत्री महोदय, आरोग्य मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या माध्यमांतून हेच सांगताहेत की कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळा.. स्वयंअनुशासन पाळा.. हातांच्या स्वच्छतेवर भर द्या.. बाहेर पडू नका..घरी थांबा..!

आपल्या सुरक्षेसाठी आपल्याच घरी थांबण्यासाठी शासन आणि प्रशासन विविध प्रकारे आवाहन करताहेत .. सांगताहेत की घरी थांबा..! गर्दीचं प्रमाण कमी झालंय देखील.. पण प्रमाण कमी होऊन भागणार नाही, तर अत्यावश्यक सुविधा पुरवणारे व्यक्ती वगळून सर्वांनी घरी थांबण्याची गरज आहे. आरोग्य, वीज, पाणी, अन्नधान्य सुविधा पुरवणाऱ्या विभागांबरोबरच पोलीस, महसूल प्रशासन तसेच शासनाची योग्य व अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणारा शासनाचा माहिती व जनसंपर्क विभाग अविरत कार्यरत आहे.

कोरोनाचा विषाणू थंड ठिकाणी अधिक काळ टिकतो, म्हणून आपण दारे-खिडक्या उघड्या ठेवून एसी बंद ठेवायला हवाय. विषाणूच्या प्रतिबंधासाठी रेल्वेस्थानके, बसस्थानकांवर गर्दी न करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करणे, गर्दी टाळणे, शक्यतो घराबाहेर न जाणे अशी खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. या विषाणूचा फैलाव थांबवण्यासाठी योग्य ती दक्षता बाळगून आपण आपल्या घरी थांबून कुटुंबियांना वेळ देऊ शकतो.. मुलांना आनंद देऊ शकतो..!

कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी स्वतःला एका शपथेमध्ये बांधून घेण्याची गरज आहे.. ती म्हणजे.. या राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना सर्वजण एकजुटीने करुया.. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सूचनांचे तंतोतंत पालन करुया.. प्रशासनाचे आदेश पाळून समाजाला सहकार्य करुया.. घरी थांबुया.. स्वयंअनुशाशीत राहूया.. सतर्क, जागरुक आणि सुरक्षित राहूया.. या संकटाला घाबरुन न जाता दक्षता बाळगुया.. स्वतः ची काळजी घेऊन एकमेकांची काळजी घेवूया.. आणि या राष्ट्रीय संकटावर धीराने..संयमाने निश्चितच मात करुया..!