देशाच्या सार्वभौम विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – खासदार गिरीश बापट

Share this News:

5 जुलै 201 9 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. देशाच्या सार्वभौम विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असेच या अर्थ संकल्पाचे वर्णन करावे लागेल. देशाचा विकास करायचा असेल तर खेड्यांचा विकास झाला पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. मोदीजींचे हेच स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. ग्रामीणभाग तसेच मध्यमवर्गीय भागाच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही मध्यमवर्गीयांच्या हितासाठी काम करू असे वचन मोदीजींनी दिले होते. छोट्या व्यापाऱ्यांना मदतीचा हात दिल्यास ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होईल या विचाराने साठ वर्ष पूर्ण करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना तसेच दुकानदारांना पेन्शन देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.  त्याच प्रमाणे लघु व मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकार 350 कोटी रुपये देणार  आहे. छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच सरकार ई पोर्टल निर्माण करणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. व्यापारी या निर्णयाचे स्वागत करतील याचा मला विश्वास आहे.  मागील अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे या अर्थसंकल्पात ही पाच लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. मध्यमवर्गाला आता घर घेणं सोप होणार आहे. कारण 45 लाख किंमतीचे घर घेतल्यास त्यावरील दीड लाख रुपये व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच आता गृहकर्जाच्या व्याजावर मिळणारी सूट 2 लाखावरून 3.5 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे 2022 पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल.

 

 देशाच्या उन्नतीसाठी शेती उत्पादन वाढले पाहिजे यासाठी सरकारने विविध उपाय योजना केल्या आहेत. या अर्थसंकल्पात  2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. शेती उत्पन्नात वाढ झाल्याने बळीराजा सुखावेल. 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचा विचार ही या अर्थसंकल्पामधून केला आहे. यामुळे देशातील दुष्काळी स्थिती नियंत्रणात येईल.आजवर देशातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात होते. आता ‘स्टडी इन इंडिया’ या योजनेअंतर्गत परदेशातील विद्यार्थ्यांना भारतात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेर घर समजले जाते या निर्णयाचा पुण्याला नक्की फायदा होईल. अशा प्रकारे शेती, लघुउद्योग, व्यापारी, गृहिणी, युवा, मध्यमवर्गीय, विद्यार्थी या सर्वांच्या विकासाचा निश्चय करणारा हा अर्थसंकल्प आहे असे म्हणता येईल.