पुणे पोलीस तुम्ही उत्तम कामगिरी करत आहात असे मी तुमचे कौतूक करतो : उपमुख्यमंत्री अजित पवार 

Dy CM Ajit Pawar at Pune police

Support Our Journalism Contribute Now

पुणे दि.12/06/2020 : माणूसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उत्तम कामामुळे पुणे पोलीसांप्रति नागरिकांचा आदर वाढला आहे. सीमेवरील जवानांप्रमाणे पोलीसांच्या कामाचा राज्याला अभिमान आहे, असे गौरवोद्गार आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन कालावधीत पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या, यावेळी ते बोलत होते. पुणे शहर पोलीस कर्मचारी बॅच 2012 च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्री पवार यांनी भेट देऊन पोलीसांची विचारपूस केली.
लॉक डाऊन कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांच्या माहिती फलकाची पाहणी करुन केली. तसेच कोरोनाचा धैर्याने सामना करत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पवार यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. या कालावधीत काम करताना फिजिकल डिस्टनसिंग, सॅनिटायझरचा वापर आदी दक्षता बाळगून काम करा, असे सांगितले. यावेळी लोकडाऊन कालावधीत चांगली कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कामगिरीचे बनविण्यात आलेले ‘फील द बिट’ पुस्तिकेचे पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी मागील 3 महिन्यांपासून राज्यातील पोलीसांनी संवेदनशीलता दाखवत निरंतर काम करुन पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे. यापुढेही शासनाच्या विविध आदेशांची अंमलबजावणी करुन कोरोनाला राज्यासह देशातून हद्दपार करुया, असे सांगून नागरिकांनी पुन्हा जोमाने उभे राहण्यासाठी आपण प्रयत्न करुया, असे ते म्हणाले.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे तसेच लॉकडावून कालावधीत पोलिसांनी प्रभावीपणे केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन ते म्हणाले, पोलिसांना चांगली घरे मिळवून देण्यासाठी यापुढे निश्चितच प्रयत्न केले जातील.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, लॉकडाऊन कालावधीत सोशल पोलीसिंग, आऊटरिच, स्क्रिनिंग, कंटेन्मेंट झोन परिसरात कडक निर्बंध राबवण्याबरोबरच जनजागृती करण्यासाठी पोलीस शिपायांपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मनापासून काम करुन कोरोना नियंत्रणासाठी योगदान दिले आहे.
सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी लॉकडाऊन कालावधीत पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरणातून माहिती दिली.
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व स्थलांतरित मजुरांसाठीचे काम, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे यांनी सोशल पोलिसिंग सेल बाबत, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी प्रवासी पास बाबत, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सोशल मीडिया चित्रफिती बाबत व जनजागृती पुस्तिकांबद्दल, तर पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्र यांनी पोलीस कल्याणकारी योजनांबाबत, तसेच पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी क्वारंटाईन व ड्रोन द्वारे नियंत्रण बाबत तसेच अन्य परिमंडळ 1 ते 5 पोलीस उपयुक्तांनी त्यांच्या परिमंडळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
सदर वेळी अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी व पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कांनवरू हे हजर होते. सदर वेळी  पुणे शहर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे मुद्दे निहाय सादरीकरण हे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी बनविले आहे.
Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.