अखंडित वीजपुरवठा व उत्कृष्ट ग्राहकसेवेच्या जबाबदारीला प्राधान्य : ऊर्जामंत्री  बावनकुळे यांचे आवाहन

पुणे येथे प्रकाशभवनमध्ये आयोजित बैठकीत ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचा आढावा घेतला. यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत, प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे उपस्थित होते.

Share this News:

पुणे, दि. 26 जुलै 2019 : गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात ऊर्जा क्षेत्राचा कायापालट करण्याचे काम प्रभावीपणे झाले आहे. महावितरणच्या माध्यमातून वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासोबतच ग्राहकसेवा देखील पारदर्शक झाली आहे. त्यामुळे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी अखंडित वीजपुरवठा व आपुलकीच्या उत्कृष्ट ग्राहकसेवेच्या जबाबदारीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

सेनापती बापट मार्गावरील ‘प्रकाशभवन’मध्ये शुक्रवारी (दि. 26) आयोजित बैठकीत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणच्या विविध कामांचा व ग्राहकसेवेचा आढावा  ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक
(प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत, प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे उपस्थित होते.

ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की येत्या काळात राज्याची मागणी 35 हजार मेगावॅटवर जाणार आहे. त्यासाठीच्या नियोजनानुसार वीजयंत्रणेची कामे करण्यात येत आहेत.

गेल्या साडेचार वर्षांत महावितरणसह ऊर्जाक्षेत्रात प्रभावी कामे झाली आहेत. महावितरणच्या माध्यमातून अनेक नवीन प्रकल्प, योजनांची अंमलबजावणी झाली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवा व अंतर्गत प्रशासकीय कारभार पारदर्शक व ऑनलाईन झाला आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार व त्यांच्या टीमने उत्कृष्ट काम केले व त्याची दखल घेऊन पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनीही महावितरणचा गौरव केला आहे.

उर्जा क्षेत्रातील सर्व विकासकामांचा केंद्रबिंदू हा वीजग्राहकच आहे. त्याचा फायदा हा प्रत्येक वीजग्राहकाला झाला पाहिजे. त्यामुळे सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व तत्परतेने ग्राहकसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण बांधील आहे व ग्राहकांना आपुलकीने व सौजन्याने वागणूक देणे सुद्धा अपेक्षीतच आहे. वीजग्राहकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी दौरे काढून संवाद साधा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रात दौरे केल्यास 90 टक्के प्रश्न सुटतील.

विजेची उपलब्धता मुबलक आहे. मात्र तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तत्परतेने सुरळीत केला पाहिजे. यामध्ये हेतुपुरस्सर विलंब लावू नका. नकारात्मक मानसिकतेमुळे महावितरणची व पर्यायाने शासनाची बदनामी होते. याची जाणीव ठेऊन अभियंता व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहावे, असे आवाहन ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी केले. वीजसुरक्षेसाठी कायम दक्षता घ्यावी व विद्युत अपघात होणार नाही यासाठी वेळोवेळी व तातडीने उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी यावेळी पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडळातील वीजहानी, ग्राहकांच्या समस्या, अपूर्ण कामे, महावितरणच्या विविध योजना व प्रकल्पांचा आढावा घेतला. महावितरणने सर्वच ग्राहकसेवा ऑनलाइन केल्या आहेत. त्याच जलदगतीने कार्यालयीन कामकाज करा. विनाकारण व हेतुपुरस्सर त्रास वीजग्राहकांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. तसेच वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची व वितरण हानीची जबाबदारी ही संबंधीत अभियंते व त्यांच्या वरिष्ठांवर निश्चित होणार आहे, असे श्री. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले. यावेळी महावितरणचे विविध योजना, प्रकल्प व ग्राहकसेवांबाबत संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत यांनी आढावा घेतला. या बैठकीला मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले (कोल्हापूर), श्री. सचिन तालेवार (पुणे) यांच्यासहर पुणे प्रादेशिक विभागातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंता व अधिकारी उपस्थित होते.