सर्वांसाठी घरे : स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.29 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘सर्वांसाठी घरे आणि परवडतील अशी घरे‘ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे, मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस केंद्रीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, क्रिडाई व नारडेको या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर निश्चितच ठोस उपाय शोधले जातील. यात त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि केंद्र शासनाकडून मिळणारे सहकार्य महत्त्वाचे आहे.
बैठकीत गृहबांधणी प्रकल्प तसेच झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली.