Farming will continue as normal during lockdown : District Collector Naval Kishore Ram

Share this News:

लॉकडाऊन कालावधीत शेती अनुषंगिक कामे सुरळीत सुरु ठेवावीत-जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुणे, दि.12 :- लॉकडाऊन कालावधीत शेती अनुषंगिक कामे सुरळीत पार पाडता येतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ अन्वये 13 मार्च 2020 पासून लागू करुन अधिसूचना निर्गमित केलेली आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील अधिसुचना क्रं.कोरोना 2020/ प्रं.क्रं.58/आरोग्य 5 दि.14 मार्च 2020 च्या आदेशान्वये प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने पुणे जिल्हयात 14 एप्रिल 2020 चे 24 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करीत असून या कालावधीत (5) त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास प्रतिबंध निर्गमित करण्यात आले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा प्रतिबंधामधून वगळण्यात आले आहे. तथापि, गृहसचिव , भारत सरकार नवी दिल्ली यांनी सर्व राज्याचे मुख्य सचिव यांना उद्देशून दिलेल्या अर्धशासकीय पत्रात नमूद केल्यानुसार लॉकडाऊनच्या कालावधीत कृषी विषयक कामांना ग्रामीण भागात सूट देण्यात आलेली आहे.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत शेती अनुषंगीक शेतकरी व शेतमजुरांची शेतीविषयक कामे, शेती/ कृषी उत्पादनाची खरेदी विषयक कामे, मंडी/बाजार समित्यांची‍ कृषी विषयक कामे, पीक पेरणी संबंधाने यंत्राच्या हालचाली, कृषी यंत्राच्या दुरुस्तीसाठी आवश्यक कामे, दुकाने इत्यादी कामे सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रतिबंधीत यादीतून वगळण्याचे आदेशीत केले आहे.
तसेच उपरोक्त काम पार पाडताना कोव्हिड-19 या विषाणू संसर्गाविषयी आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे निर्देश पाळावेत आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग प्रतिबंध कायदा तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राम यांनी कळविले आहे.