Fight against EVM goes to Delhi

Share this News:

“ईव्हीएम’ विरोधातील लढाई दिल्लीतही लढू

तेहसीन पूनावाला यांची घोषणा; कृती समिती राष्ट्रपतींना भेटणार

पुणे, दि. 4 (प्रतिनिधी) – पुणे महापालिकेच्या निवडणुकीत इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गोलमाल करूनच भाजपने विजय संपादन केला आहे, या विरोधात आवाज उठविला तर सरकारी यंत्रणा तो दाबण्याचा प्रयत्न करते, आम्हाला अधिकृत कागदपत्रे देखील उपलब्ध करून दिली जात नाहीत; पण आम्ही गप्प बसणार नाही आहोत, पुण्यातून सुरू झालेली ही लढाई आम्ही आता दिल्लीमध्ये नेणार आहोत. राष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासमोर आम्ही आमचे म्हणणे मांडू असे प्रतिपादन “ईव्हीएम’विरोधी कृती समितीचे मार्गदर्शक आणि युवा नेते तेहसीन पुनावाला यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
यावेळी दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, रूपाली ठोंबरे पाटील, विजय कुंभार, बंडू केमसे, राहुल तुपेरे. नाना दांगट आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरातील 41 प्रभागांमध्ये मतदानाच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आढळून आली असल्याचे सांगताना पूनावाला म्हणाले की, “” शहरामध्ये महापालिका निवडणुकीचा ज्वर शिगेला पोचला असताना 15 फेब्रुवारी रिजी सर्व उमेदवारांच्या समक्ष “ईव्हीएम’ मशीन सील करण्यात आले पुढे 20 फेब्रुवारीला तांत्रिक त्रुटींचे कारण पुढे करून मशीन बदलण्यात आले. अचानक ही यंत्रे कशी काय बदलण्यात आली, ऐनवेळेला त्या यंत्रांमध्ये त्रुटी आहेत हे निवडणूक अधिकाऱ्यांना कसे काय समजले? प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान कक्षांमध्ये वेगळीच यंत्रे बसविण्यात आली होती. निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या या गलथान कारभारविरोधात आम्ही आवाज उठविला तर तो दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही या विरोधात न्यायालयात जाऊ म्हणून आम्हाला अधिकृत कागदपत्रे देखील दिली जात नाहीत. आतापर्यंत आम्ही सनदशीर मार्गाने लढा दिला पण भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाचा अवलंब करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही.” प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीमध्येही तफावत दिसते. ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली असता आयोगच ही आकडेवारी ग्राह्य धरत नाही असेही त्यांनी नमूद केले. रूपाली पाटील यांनीही यावेळी “ईव्हीएम’च्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित केली. भाजपचे सगळे विजयी उमेदवार हे “ईव्हीएम’ने निवडून आणलेले असल्याचे त्यांनी नमूद केले. बंडू केमसे यांनी “ईव्हीएम’च्या माध्यमातून भाजप सरकारने आमची मते चोरल्याचा दावा केला. स्थानिक प्रशासन कागदपत्रे द्यायला तयार नाही, महापालिकेचे आयुक्त भाजपचा माणूस असल्यासारखे वागतो असा आरोप त्यांनी केला. विजय कुंभार यांनीही मानवी हस्तक्षेपाच्या माध्यमातून मतदान यंत्रांमध्ये बदल करता येऊ शकतो असे सांगत मशीन जरी चांगले असले तरीसुद्धा त्याला वापरणारे हात आणि त्यामागचा मेंदू कसा आहे यावर बरेच काही अवलंबून असल्याचे त्यांनी केले.