सैनिक मित्र परिवारातर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रात केली अनोखी राखीपौर्णिमा साजरी

पुणे, 16/8/2019 : भारतमातेच्या रक्षणासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावून सैनिक प्राणपणाने लढत असतात. शत्रूंशी लढाई करून दोन हात करताना अनेक सैनिक शहीद होतात, तर अनेकांना अपंगत्व येते. अशा दिव्यांग सैनिकांना आम्ही कायम तुमच्याबरोबर आहोत, असे सांगत सैनिक मित्र परिवारातील महिलांनी राखीचे अनोखे बंधन बांधत अतूट नाते जोडले. प्रेमाने आपल्या भाऊरायांना ओवाळत त्यांच्या वेळोवेळी संरक्षण करणा-या हातांना राखी बांधत आणि पेढे, लाडूचा घास भरवित कृतज्ञतापूर्ण राखीपौर्णिमा साजरी केली.
सैनिक मित्र परिवारातर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील सैनिकांसाठी अनोख्या राखीपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औंध श्री शिवाजी विद्या मंदिर, आॅल सेंट हायस्कूल, सि. आर. रंगनाथन कर्णबधीर स्कूल, अहिल्यादेवी हायस्कूल अशा विविध शाळा, महाविद्यालयातल्या विद्यार्थिनी तसेच लायन्स क्लब व इतर संस्थांमधील महिलांनी देखील या सैनिकांशी आपुलकीचे नाते जोडले. केंद्राचे प्रमुख पी.आर.मुखर्जी, कर्नल बी.एल.भार्गव, शुभांगी आफळे, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, यशश्री आठवले, नंदा पंडित, पल्लवी जाधव, कल्याणी सराफ, माला रणधीर, सुलक्षणा जाईल उपस्थित होते.
आनंद सराफ म्हणाले, देशाच्या सीमेवर लढत असताना अथवा निसर्गाविरुद्ध लढताना देखील जखमी होत असतात. सियाचिनमध्ये रक्त गोठवणा-या थंडीमध्ये आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी जवान कायम तत्पर असतात. असे सीमेचे रक्षण करताना अपंगत्व आलेले जवान या केंद्रामध्ये राहतात. अशा सैनिकांप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी आपण हे आपुलकीचे बंधन जोडले आहे. सैनिकांच्या आयुष्यातील ही देखील दुसरी लढाई असते.
अपंग सैनिक भोपालसिंग चौधरी म्हणाले, आज राखीपौर्णिमा साजरी करताना आमच्या कुटुंबियांसमवेत रक्षाबंधन साजरे केल्याचा आनंद मिळाला. या महिला व मुलींनी राखी बांधली याचा खूप आनंद आहे. अपंगत्व आले असले तरी आजही शत्रूशी दोन हात करण्यासाठी सीमेवर जाऊन लढण्याची ताकद या हातांमध्ये आहे असेही त्यांनी सांगितले.
सैनिकांना राख्या बांधून खूप आनंद झाला. तसेच कोणत्याही परिस्थितीत संकटांचा खंबीरपणे सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, याची प्रेरणा देखील या सैनिकांकडून मिळाली, अशा भावना विविध शाळेतील विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.