पुण्याचा कचरा डेपो मोशीत करण्याचा डाव उधळला, ‘सफारी पार्क’साकारणार

Share this News:

पिंपरी, 31 /8/2019 : मोशी येथील नियोजित सफारी पार्कच्या जागी पुणे महापालिकेचा कचरा डेपो नव्हे. तर, आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’ साकारण्यात येणार आहे. कचरा डेपोला जागा देण्याचा डाव भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी हानून पाडला आहे. सफारी पार्क करण्याबाबत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी येत्या मंगळवारी (दि. 3) मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील मंजूर विकास आराखड्यातील मोशी येथील गट नंबर 646 या सरकारी गायरान जमिनीवर सुमारे 33.72 हेक्टर क्षेत्र आ. क्र 01/ 207 सफारी पार्क म्हणून आरक्षित करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात सफारी पार्कची आरक्षित जागा पुणे महापालिकेने स्वतंत्र कचरा डेपोसाठी मागितली होती. परंतु, सफारी पार्कची जागा देण्यास आमदार महेश लांडगे यांनी कडाडून विरोध दर्शविला होता. कचरा डेपो करण्याचा डाव त्यांनी हाणून पाडला आहे. या जागी सफारी पार्क साकारण्यात येणार आहे.
सफारी पार्कची आरक्षित गायरान आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनुसार पिंपरी महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे सफारी पार्क साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षित जागेवर सफारी पार्क विकसित करण्याबाबत, त्याला चालना देण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी (दि. 3) बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.
आमदार महेश लांडगे म्हणाले, भोसरी विधानसभा मतदार संघातील महापालिकेत समाविष्ट झालेल्या चिखली, मोशी, च-होली परिसरात मोठ्या संख्येने विकास कामे होत आहेत. महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ (एमटीडीसी) आणि पिंपरी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सफारी पार्क साकारण्यात येईल.
भोसरी मतदारसंघात एज्युकेशन हब, इंडस्ट्रिअल हब, संतपीठाच्या माध्यमातून निर्माण होणारे सांप्रदायिक व्यासपीठ विकसित होत आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यायलही याच भागात निर्माण होणार आहे. मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सफारी पार्क’ विकसित झाल्यास पर्यटन क्षेत्रात पिंपरी-चिंचवडची नोंद जागतिक नकाशावर होईल. समाविष्ट गावाच्या विकासांना आणखीन चालना मिळेल, असेही आमदार लांडगे म्हणाले