आव्हानात्मक कामे करायला आवडते – श्रीरंग बारणे

Share this News:
निगडी येथील ‘आयसीएआय’ला बारणे यांची सदिच्छा भेट
पिंपरी, २४ मार्च – स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात काही आदिवासी भागात वीज पोहोचली नव्हती. त्या आदिवासी भागात वीज पोहोचवणे अतिशय आव्हानाचे काम होते. अशा प्रकारचे आव्हान स्वीकारून काम करायला मजा येते, असे मत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी निगडी येथे व्यक्त केले.
निगडी येथील इंडियन चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट (आयसीएआय) ला खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली. यावेळी संस्थेतील चार्टर्ड अकाउंटंटशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाध्यक्ष मावळ गजानन चिंचवडे, संस्थेचे अध्यक्ष संतोष संचेती, उपाध्यक्षा सीमरन ललवाणी, सचिव पंकज पाटणी, सचिन बन्सल, शैलेश बोरे, चंद्रकांत काळे, विजयकुमार बाभणे, आनंद जकोटीया, हरीश ललवाणी, संतोष राका आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, “मावळ लोकसभा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पठारी प्रदेशासह डोंगरभाग देखील मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारसंघात काही दुर्गम डोंगराळ प्रदेश देखील आहे. काही डोंगराळ भागात आजवर रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सोयी देखील पोहोचल्या नाहीत. अशा भागात जाऊन तिथल्या नागरिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविणे मी प्राथमिकता समजतो. स्वातंत्र्याला सत्तर वर्ष झाल्यानंतर देखील काही भागात वीज पोहोचली नव्हती. त्या भागात प्राथमिकता देत वीज पोहोचवली. अशा प्रकारच्या लोकोपयोगी उपक्रमांमधून मी आजवर केवळ माणसे जोडण्याचे काम केले आहे.
आयसीएआय येथे ‘जीएसटी अनुपालन आणि रिअल इस्टेट अनियंत्रित ठेवींवर बंदी’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात उपस्थित चार्टर्ड अकाउंटंटशी संवाद साधताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट महत्वाची भूमिका बजावतात. या माध्यमातून ते सुद्धा देशसेवा करत आहेत. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट योग्य दिशा देतात.”