MANS demands case against Sambhaji Bhide for his mango for children remark
संभाजी भिडे यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल करावा अंनिसची मागणी
• संभाजी भिडे यांनी अपत्य प्राप्ती करिता माझ्याकडे एक झाड आहे आणि त्याची फळे चाखली तर ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होतो, अपत्य हवे त्यांना अपत्य होते असे विधान केलेले आहे, ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हे विधान पूर्णतः अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहे.
• मुलगा किंवा मुलगी होण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे, स्त्री-पुरुष मिलनातून ती प्रक्रिया आकार घेते. पुरुषाचे XY क्रोमोझोम आणि स्त्रीचे XX क्रोमोझोम यातील XX एकत्र आले की मुलगी जन्माला येते आणि XY एकत्र आले तर मुलगा जन्माला येतो. हे बदलण्याचा दावा करणारे सगळे भोंदू आहेत. भिडे यांनी “ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होतो” यावर जोर दिला आहे. त्यामुळे त्यांचा जो दावा आहे तो निखालसपणे खोटा तर आहेच पण स्त्री-पुरुष विषमतेचे उघडपणे समर्थन करणारा आहे. भिडे या वाक्यातून हेच सांगू पाहत आहेत की, ज्यांना मुलगा हवा असेल त्यांनी या आंब्याची फळे चाखा.
• आपल्या देशात भ्रूणहत्येचा कायदा तयार करण्यात आलेला आहे. ज्यात लिंग निवड चाचणीला पूर्णतः प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या कायद्यात लिंग बदलून मिळणे किंवा निवड करणे याला गुन्हा ठरविण्यात आलेला आहे. भिडे यांनी जे विधान केलेले आहे ते थेट या कायद्याच्या कक्षेत येते. भिडे थेटच मुलगा हवा असेल तर मुलगाच होईल हे जे ठामपणे सांगत आहेत हा लिंग निवड करण्याचा, लिंग भेद करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे हा कायद्याचा अपमान तर आहेच त्यापेक्षा अधिक त्याचा भंग आहे. त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाव चा नारा देणाऱ्या सरकारने याबाबत तातडीने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला पाहिजे.
• भिडेंच्याच काय जगातील कोणत्याही झाडाची फळे चाखून मुले होत नाहीत, त्यासाठी स्त्रीबीज आणि पुरुष बीज एकत्र यावेच लागते. भिडे यांचे विधान अज्ञानमुलक आहे. ते काहीतरी अवैज्ञानिक असल्याचा दावा करीत आहेत, ज्याला कसलाही आधार नाही. भिडे यांचे म्हणणे हे संपूर्ण वैज्ञानिक प्रक्रियेला आव्हान देणारे आहे. अंनिस त्यांना आवाहान देते की, आम्ही त्यांना 10 अपत्य न होणारे जोडपी देतो, त्यांनी त्यांना आंबा खाऊ घालावा, त्या अपत्यांना आंब्यांचा चमत्कार दाखवून द्यावा. नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी.
• सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांनी एक अभंग सांगितला आहे – नवसे होती पुत्र प्राप्ती तर का करणे लागो पती?” हा प्रश्न वारकरी संप्रदायाचे शिखर असलेल्या तुकोबांनी साडे तीनशे वर्षापूर्वी विचारला. तोच प्रश्न आज भिडे सारख्या भोन्दुंना विचारण्याची गरज आहे.
• भिडे हे केवळ अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान करत आहे असेच नाही तर सामाजिक सलोखा नष्ट करण्यासाठी तलवार हातात घेण्याचा देखील उच्चार करणारे व्यक्ती आहेत. त्यामुळे ही अशी व्यक्ती लोकांच्या आरोग्याशी आणि सामाजिक आरोग्याशी देखील खेळत आहेत. भिडे यांनी आतापर्यंत अनेक प्रक्षोभक भाषणे केलेली आहेत, त्यामुळे अश्या व्यक्तीच्या सामाजिक वावरास प्रतिबंध घालणे सरकारचे काम आहे आणि त्यांनी ते तत्परतेने केले पाहिजे.