आमदार लांडगे यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : भोसरी-दिघीला जोडणारा रस्ता रात्रीत मार्गी!

Share this News:

पिंपरी : भोसरी आणि दिघीला जोडणारा सावंतनगर येथील रस्ता गेली पंचवीस वर्षे प्रलंबित होता. मात्र, स्थानिक नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आमदार महेश लांडगे यांनी अखेर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. प्रशासन आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन एका रात्रीत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले.

 

याबाबत बोलताना स्थानिक नगरसेवक सागर गवळी म्हणाले की, भूसंपादनाच्या मोबदल्यात महापालिका प्रशासनाकडून मिळणाऱ्या परताव्याबाबत बधित गवळी आणि काटे कुटुंबियांमध्ये नाराजी होती. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टिने सर्वांना सोबत घेवून तोडगा काढला आहे. त्यामुळे गवळी आणि काटे कुटुंबियांच्या सकारात्मक पुढाकार घेतला आणि रस्त्याच्या कामाला चालना मिळाली.

 

स्थानिक नेते संजय गायकवाड म्हणाले की, दिघी परिसरात सध्या सुमारे ८० ते ९० हजार लोकसंख्या आहे. या भागातील नागरिकांना भोसरी आणि संबंधित परिसरात ये-जा करण्यासाठी सावंतनगर येथील रस्ता अत्यंत सोईचा ठरणार आहे. भोसरी परिसरातील अंतर्गत रस्ते विकसित करण्याची भूमिका आमदार महेश लांडगे यांनी घेतली. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुमारे ८४ लाख रुपये खर्च करून हा रस्ता सुसज्ज करण्यात येणार आहे. सध्या सुमारे ९ मीटर रुंदीचा हा रस्ता विकसित केला आहे.