लॉकडाऊनच्या काळात शिवाजीनगर मतदार संघात नागरिकांसाठी फिरता दवाखाना

Share this News:

पुणे, दि. ११ एप्रिल, २०२० : सध्या कोविड १९ विषाणूच्या संसर्गाची भीती वाढत असताना इतर आरोग्य समस्यांशी झगडणा-या रुग्णांना ओपीडी, दवाखाने, चिकित्सालये बंद असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हेच लक्षात घेत शिवाजीनगर मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या संकल्पमधून मतदार संघातील नागरिकांसाठी फिरता दवाखाना सुरु करण्यात आला आहे.

 

शांतीलाल मुथा, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या मदतीने हा दवाखाना सुरु करण्यात आला असून या द्वारे दारोदारी फिरून रुग्णांना वैद्यकीय मदत व सल्ला दिला जात आहे. यावेळी नगरसेविका निलिमा खाडे व दत्ता खाडे उपस्थित होते.

 

सध्याच्या परिस्थतीत नागरीकांनी घराबाहेर पडणे धोक्याचे असताना त्यांना सर्व सोयी घरच्या घरी मिळाव्यात यासाठी मतदार संघातील कार्यकर्ते काम करीत आहेत. विशेषत: वंचित घटकांची गैरसोय होऊ नये याकडे आम्ही लक्ष देत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हा फिरता दवाखाना सुरु करण्यात आला असून मतदार संघातील प्रत्येक भागात तो फिरणार आहे. यामध्ये डॉक्टरांबरोबरच त्यांना प्राथमिक उपचारासाठी आवश्यक साधने व औषधे यांची सोय करण्यात आली असल्याची माहिती या वेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली. अशा पद्धतीचे आणखी काही दवाखाने सुरु करण्याची आमची तयारी असून या दवाखान्यासाठी डॉक्टरांची आम्हाला गरज आहे. त्यामुळे सामाजिक जाणीवेतून डॉक्टरांनी मदत करावी असे आवाहन देखील शिरोळे यांनी केले आहे. ज्या डॉक्टरांना या कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी ९४२०४७७०५२ या क्रमांकावर संपर्क साधावा