Nashik phata to Chandoli road will be six lane
नाशिकफाटा ते चांडोली रस्ता होणार सहापदरी; आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
निविदा प्रक्रिया होणार दीड महिन्यात पूर्ण
महेशदादांनी मानले रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजप सरकारचे आभार
पिंपरी, 12 डिसेंबर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली(खेड) रस्ता सहापदरीकरण या 29.93 कि.मी. लांबीच्या 1013.78 कोटी रकमेच्या कामास मान्यता मिळाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया येत्या दिड महिन्यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. सहापदरीकरण करण्यास मान्यता दिल्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजप सरकारचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले आहेत.
नाशिक फाटा ते चांडोली(खेड) हा 29.93 किलो मीटर लांबीचा सहापदरीकरणासह संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन चाकण येथे 2.25 किलो मीटर मोशी येथे 2.55 किलो मीटर तर चिंबळी येथे 700 मीटर लांबीचे सहापदरीकरण असलेले उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. भोसरी एमआयडीसी, इंद्रायणीनगर, कुरुळी, महाळुंगे, आळंदी फाटा आदीसह विविध ठिकाणी वाहनांसाठी भुयारी मार्ग करण्यात येणार असून स्पाईन रोड, वाकी खुर्द येथे वाहनांसाठी ओव्हरपास करण्यात येणार आहे.
तसेच इंद्रायणी व भामा नदी अशा दोन ठिकाणी मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. वाहनांसाठी भुयारी मार्ग करण्यात येणा-या ठिकाणी स्थानिक वाहतूक भुयारी मार्गाने तर लांबपल्याच्या वाहनांसाठी त्यावरील सहापदरी महामार्गाने वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाला भूसंपादनासह सुमारे 2000 कोटी खर्च अपेक्षित आहे.
याबाबत बोलताना भोसरीचे आमदार महेश लांडगे म्हणाले, ”नाशिकफाटा ते चांडोली या रस्त्याचे सहापदरीकरण व्हावे. यासाठी गेली चार वर्षांपासून मी केंदीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. याबाबत गडकरी साहेबांकडे वारंवार बैठका झाल्या. गडकरी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अथक पाठपुराव्यानंतर 14 जानेवारी 2016 रोजी या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया येत्या दिड महिन्यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात येणार असून लवकरच या महत्वकांक्षी कामाला सुरुवात होणार आहे”.
”या महामार्गावरील वाढलेली प्रचंड वाहनसंख्या, भविष्यातील वाहतुकीची होणारी कोंडी या सर्व बाबींचा अभ्यास करून रस्त्याचा प्रकल्प अहवाल करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे भविष्यात पुणे-नाशिक महामार्गावरील दळण-वळणाचा ताण कमी होऊन येथील वाहतूक व्यवस्था सक्षम होणार आहे. प्रकल्प अहवालाला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप सरकारचे मी मनापासून आभार मानतो. भाजप सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. आगामी काळात आणखीन मोठ-मोठ्या प्रकल्पांची कामे सुरु होणार आहेत”.
महापौर नितीन काळजे म्हणाले, ”नाशिकफाटा ते चांडोली या रस्त्याचे सहापदरीकरण व्हावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे भोसरीचे आमदार महेश लांडगे पाठपुरावा करत होते. तसेच पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पालिका स्तरावरुन देखील या रस्त्याच्या सहापदरीकरणासाठी पाठपुरावा केला जात होता. महेशदादांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे”.