21व्या शतकातील भारत निर्माण करण्याची ताकद अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात : ऊर्जामंत्री बावनकुळे यांचे प्रतिपादन

Share this News:

पुणे, दि. 26 जुलै 2019 – एकविसाव्या शतकातील भारत निर्माण करण्याची ताकद अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात असून महाऊर्जा व महावितरणची वाटचाल त्याच दिशेने सुरु असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.

महाऊर्जाच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ऊर्जामंत्री बोलत होते. व्यासपीठावर याप्रसंगी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, महाऊर्जाचे महासंचालक कांतीलाल उमप, महानिर्मितीचे संचालक पुरुषोत्तम जाधव, अतिरिक्त महासंचालक विशाल शिवतारे, प्रादेशिक संचालक महेश आव्हाड उपस्थित होते.

महाराष्ट्र हे सर्वाधिक अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारे राज्य असल्याचा उल्लेख करून ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे 175 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निमितीचे लक्ष्य आम्ही पूर्ण करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाची जबाबदारी मला दिल्यानंतर महाऊर्जाच्या कामास गती देण्यास मी प्राधान्य दिले. राज्याच्या 12 कोटी जनतेपर्यंत अपारंपरिक ऊर्जेची माहिती पोचावी यासाठी महाऊर्जा प्रयत्नरत आहे. सौभाग्य योजनेच्या माध्यमातून आज शेतकरी-शेतमजूर व आदिवासींपर्यंत आपण पोहोचलो आहे. ज्या 19 लाख परिवारांकडे वीज कनेक्शन नव्हते, त्या सर्व परिवारांच्या घरातील अंधार दूर करण्याचे काम या शासनाने केले आहे.

अपारंपरिक ऊर्जा साठवण्याची व्यवस्था झाली तर या राज्यात क्रांती होणार आहे. असे झाले तर दिवसा व रात्रीही आपण सौर ऊर्जा लोकांना देऊ शकू असे सांगून ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, राज्यातील 45 लाख शेतकरी सौर ऊर्जेवर आल्यानंतर क्रास सबसिडी संपणार असून त्यामुळे औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांचे वीजदर कमी होतील.

सौर ऊर्जेची 2 रुपये 63 पैसे एवढ्या कमी दरात वीज निर्मित होऊ लागली आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये घरांवर सौर वीज निर्मिती करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा दिवस जवळच आहे. पारंपरिक विजेची गरज पडणार नाही. कोळसा लागणार नाही. पाणी लागणार नाही. पर्यावरण प्रदूषण होणार नाही असेही ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.

देशाचा विकासाचा प्राण सौरऊर्जा – विजय शिवतारे
अपारंपरिक ऊर्जा हा देशाच्या विकासाचा प्राण असून असे महत्वाचे ऊर्जा निर्मितीचे काम महाऊर्जा करीत असल्याचे सांगताना जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, आज 61 टक्के वीज कोळशापासून निर्माण केली जाते. कोळशावरील वीज निर्मितीत घट झाली पाहिजे व सौर ऊर्जा निर्मिती वाढली पाहिजे. निसर्गाने आपल्याला सर्वकाही दिले आहे. आपण अभ्यास करून त्याचा लाभ घेण्याची गरज आहे. उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जेवर आणल्यामुळे 11 हजार कोटींची बचत झाल्याचेही राज्यमंत्री शिवतारे म्हणाले.

कांतीलाल उमप – सन 2016 मध्ये राज्याने 16 हजार मेगावॅट अपारंपरिक वीज निर्मिती व 1000 मेगावॅट वीज बचतीचे धोरण आखले असून या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी महाऊर्जा करीत आहे असे सांगताना महाऊर्जाचे महासंचालक कांतीलाल उमप म्हणाले, सौर, जल, पवन ऊर्जा आस्थापित केली तर मानवाची दीर्घकाळसाठी विजेची गरज भागविली जाणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. आज 5000 मेगावॅट सौर वीज निर्मिती आपण करीत आहोत. अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून जगात ऊर्जा क्षेत्राचे महत्व वाढले आहे.
2022 पर्यंत 175 गिगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यास महाऊर्जा कटिबद्ध असल्याचेही महासंचालक उमप म्हणाले.

महानिर्मितीचे संचालक पुरुषोत्तम जाधव यांनी महाऊर्जाच्या कार्याचे कौतुक केले. जेथे पारंपरिक वीज पोहोचू शकत नाही तेथे अपारंपरिक ऊर्जा पोहोचली आहे याकडेही त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून लक्ष वेधले.

या कार्यक्रमादरम्यान ऊर्जा संवर्धन या पत्रिकेचे प्रकाशन ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमापूर्वी अत्यंत प्रभावी असलेल्या महाऊर्जासंबंधी लघुपटाच्या सिडीचे प्रकाशन करण्यात आले. अल्पबचत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांची मोठ्या संख्यने उपस्थित होती.