जिल्हाधिकारी नवल किशोर रा यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

Share this News:

पुणे, दि. 16: निवडणुकीचे महत्व, मतदानाची जबाबदारी, युवा मतदारांचे कर्तव्य, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएमची पारदर्शकता अशा एक ना अनेक विषयांवर आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती देत विधानसभा निवडणुकीत नवमतदारांनी उत्साहाने व हिरीरीने सहभागी होऊन मतदान करावे व लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा,असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदार जनजागृती (स्वीप)कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती चित्ररथाचे उदघाटन व विद्यार्थ्यांसाठी मतदार जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, समन्वय अधिकारी अजय पवार, स्विपच्या आशाराणी पाटील आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

सुदृढ लोकशाहीसाठी मतदान हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, निवडणूक प्रक्रिया ही खूप मोठी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मतदानाचा हक्क हा महत्वाचा आहे. त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही ईव्हीएम बरोबरच व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर होणार असल्याने मतदान अधिक सुरक्षित आणि पारदर्शक झाल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्हयाची शिक्षण, कला, उद्योग अशा विविध क्षेत्रात वेगळी ओळख आहे, मतदान टक्का वाढवून पुण्याची नवी ओळख निर्माण करायची आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेत नवमतदारांची संख्या वाढली आहे. तरुण पिढीने मतदान करून आपले योगदान देऊन लोकशाहीच्या उत्सवाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी राम यांनी मतदानासाठी आवश्यक असलेले 11 विविध ओळखपत्र, मतदारांसाठीच्या सुविधा आदींची सविस्तर माहिती दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, 21ऑक्टोबर हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवशीप्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहीजे.विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत जागृती करणे आवश्यक असल्याचेत्यांनी सांगितले. स्वीपचे नोडल अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. या प्रशिक्षणास निवडणूक कामी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आयकॉन शशिकांत पेडवाल यांचा संवाद
अमिताभ बच्चन यांच्यासारखं दिसणं, त्यांचं अनुकरण करणं,त्यांच्यासारखं वावरणं, तसे कार्यक्रम करणं, , त्यांच्या आवाजात युवा मतदारांशी साधलेला संवाद महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चांगलाच भावला. जिल्हा आयकॉन शशिकांत पेडवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यशाळेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान करणे संदर्भात त्यांच्या आवाजात आवाहन करणारी गिते गात तर कधी चित्रपटातील संवादाची जोड देत मतदान करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सुचविलेले संवाद आणि त्यांना तेवढ्याच समर्पकपणे पेडवाल यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे हा संवाद चांगलाच रंगला. सोबतच आयकॉन सुयश जाधव यांनीहीआपले एकएक मत महत्वाचे असल्याचे सांगून प्रत्येकानेआपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले.