पुणे : देशभक्तीपर गीतांतून पुणेकरांमध्ये देशप्रेमाची जागृती

Share this News:

पुणे, 18/8/2019 : विविधतेमध्ये एकता असलेला आपला भारत देश असून अनेकांनी आपल्या प्रगल्भ लेखणीतून भारतातील वैविध्यपूर्ण संपत्तीचे दर्शन घडविले. अशाच प्रगल्भ लेखणीतून साकारलेल्या आणि अजरामर संगीताने नटलेल्या देशभक्तीपर गीतांनी भारलेल्या सुरेल संध्येची रसिकांनी अनुभूती घेतली. आओ बच्चो तुम्हे दिखाऊ… कर चले हम फिदा… मेरे देश की धरती… या गीतांना रसिकांनी मनापासून दाद दिली. तर, मिले सूर मेरा तुम्हारा या गीताने रसिकांमध्ये देशप्रेम जागृत झाले.

मॉम इंडिया, स्वच्छंद पुणे आणि डायोसिस आॅफ पुणे यांच्या वतीने मिले सूर मेरा तुम्हारा देशभक्तीचा सांगीतिक सुसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड येथील एम. ई. एस बालशिक्षण सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. दत्तात्रय तापकीर यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला.

पार्वती चव्हाण सोशल फाऊंडेशनचे गणेश चव्हाण, पुणे विद्यापीठाच्या सामाजिक विभागाचे डॉ सतीश शिरसाठ,  तंत्र व व्यवसाय शिक्षण सहसंचालक चंद्रकांत निनाळे, इन्फन्ट जिजस प्रशालेच्या प्राचार्या मारिया मेनिजेस, भारतीय सैन्यदलातील माजी अधिकारी संभाजी गायकवाड, पूना गेस्ट हाउसचे किशोर सरपोतदार, पुणे स्नेहमंचचे अजित कुमठेकर, ज्येष्ठ गायक इकबाल दरबार व गायक माणिक बजाज, उद्योजक दिनेश मदने, स्नेहभूमी पुणेचे केतन यादव, जयपाल प्रिंटर्सचे राजकुमार सुराणा उपस्थित होते. मॉम इंडियाचा ४७ वा  वर्धापनदिन यावेळी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मोहम्मद रफी यांनी गायलेल्या जहा डाल डाल पर… या गीताने झाली. यानंतर इन्साफ की डगर मै… जिस देस मै गंगा बहती है… या गीतांना रसिकांनी दाद दिली. अल्ला तेरो नाम… या गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. है प्रित जहा की… जयोस्तुते… ए वतन ए वतन… या गीतांनी रसिकांची मने जिंकली. ए मेरे वतन के लोगो… या गीताने रसिकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. छोडो कलकी बाते… मेरा रंग दे बसंती चोला… या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. वंदे मातरम्… या गीताने रसिक भारावून गेले.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आपण आत्ता स्वराज्यामध्ये आहोत. परंतु आपल्या देशाचे विकसनशील वरून विकसित देशामध्ये परिवर्तन करायचे सरकारने ठरविले आहे. लवकरच आपल्या देशाचे सुराज्यामध्ये रुपांतर होणार. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या देशाला एक बलाढ्य ताकद बनवुया.

बिशप डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, आम्ही ख्रिश्चन धर्मीय देखील भारत माता ही आमची माता मानतो. भारतमाता ही पुण्यभूमी आहे. प्रत्येक देश हा ईश्वराकडून मिळालेली पवित्र देणगी आहे असे बायबलमध्ये सांगितले आहे. जो भारतीयांच्या सुखात आपले सुख आणि दु:खात आपले दु:ख मानतो तोच खरा राष्ट्रनीष्ठ आहे. डॉ. दत्तात्रय तापकीर म्हणाले, आपण राष्ट्रभक्ती असे म्हणतो, भक्तीमागे प्रेमाचे अधिष्ठान आहे. देशाविषयी प्रेमभावनेने आपण कार्य करू तेव्हा ती राष्ट्रभक्ती ठरेल. देश ही अमूर्त संकल्पना आहे.

डॉ. रवींद्र बाळापुरे, मोहनकुमार भंडारी, प्रा. रवींद्र शाळू, आरती आठल्ये, सुश्मिता व ऐश्वर्या भंडारी यांनी गीतांचे सादरीकरण केले. विद्या नितीन यांनी निवेदन केले. पार्वती चव्हाण सोशल फाऊंडेशनने कार्यक्रमाला विशेष सहकार्य केले.