बुद्धिबळ खेळाडूंच्या निवेदनाला क्रीडामंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

Share this News:

पुणे, दि. १० सप्टेंबर, २०१९ : बुद्धिबळपटूंच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या समस्यांबाबत नुकतीच ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे, इंटरनॅशनल मास्तर शशिकांत कुतवळ, नरेंद्र सापळे (IWM सलोनी सापळे यांचे वडील), कृष्णातेर (कॉमनवेल्थ चॅम्पियन कुशागर यांचे वडील) यांनी राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आशिष शेलार यांची मुबईमध्ये भेट घेतली. कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी यामध्ये पुढाकार घेतला.

 

आशियाई / राष्ट्रकुल व जागतिक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये पदके/अजिंक्यपदे मिळवून शासनाच्या रोख बक्षीस योजनेस पात्र असलेल्या राज्यातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना मागील काही वर्षे प्रशासकीय अनास्थेमुळे पाठपुरावा करूनही बक्षीसाची रक्कम मिळू शकलेली नाही. त्याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती यावेळी या खेळाडूंनी शेलार यांना केली. तसेच जवळपास २०० देशांत खेळला जात असलेला, अतिशय लोकप्रिय असलेला व आशियाई खेळांत समाविष्ट करण्यात आलेला हा खेळ महाराष्ट्र सरकारच्या धोरणात ‘क’ श्रेणीत ढकलला गेला असून हे केंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाशीही विसंगत असल्याची बाब देखील या खेळाडूंनी समोर आणून दिली.

 

जागतिक पाताळीवरील आव्हानात्मक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करूनही बुद्धिबळपटूंना सरकार कडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. धोरणात्मक पातळीवर सुधारणा करून बुद्धिबळ या खेळाला योग्य ते प्रोत्साहन देणे अतिशय गरजेचे आहे. या बाबींचे निवेदनही या वेळी क्रीडामंत्र्यांना देण्यात आले. या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत क्रीडा मंत्र्यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले.

 

आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याने व क्रीडामंत्री यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रशासकीय पातळीवरही योग्य ते सहकार्य मिळून बुद्धिबळाच्या बाबतीतले हे प्रश्न सुटण्याची अपेक्षा यावेळी खेळाडूंनी व्यक्त केली.