सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे १६७३१ रोपांच्या वितरणाचे ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’

Share this News:

पुणे –“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करून इतिहास घडवला आहे. हे पहिले वर्ष आहे, पहिला विक्रम आहे. आता तुमचे विक्रम तुम्हालाच तोडायचा आहेत,“ अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांचा उत्साह वाढवला.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मळ वारी, हरित वारी” या अभियानाअंतर्गत विद्यापीठाच्या मैदानावर रविवारी (२३ जून २०१९) एकाच प्रकारची सर्वाधिक रोपे वाटण्याचा जागतिक विक्रम करण्यात आला. या विक्रमासाठी कडुलिंबाची १६,७३१ रोपे वाटण्यात आली. त्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपस्थित विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता, स्वास्थ्य, शौचालाचा वापर करण्याबाबतचे प्रबोधन आणि हरित क्रांती घडवून आणण्याबाबत शपथ दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 

या प्रसंगी मंचावर पुण्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील, कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर, राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे, महापौर श्रीमती मुक्ता टिळक, खासदार श्री. संजय काकडे, महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. राजेश पांडे व इतर सदस्य, आमदार श्रीमती मेधा कुलकर्णी, श्रीमती माधुरी मिसाळ, श्री. दिलीप कांबळे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांबरोबरच मोठ्या प्राध्यापक, नागरिक, अधिकारी हेसुद्धा उपस्थित होते. या उपक्रमाला मुंबईचे एस.एन.डी.टी. विद्यापीठ, नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ यांचे सहकार्य लाभले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.

 

“वारी हा जगाच्या इतिहासात अभूतपूर्व महोत्सव आहे. त्यासाठी निमंत्रण व्यवस्था नाही. त्यासाठी लोक येतात, शिस्तीत चालतात, विठुरायाचे दर्शन घेतात. हा संकल्प ७०० वर्षे चालला आहे. त्यात तुम्हीही सहभागी होऊन त्याला हरित करता आहात. त्यासाठी आपले अभिनंदन करतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

पालकमंत्री श्री. पाटील या विक्रमाबाबत म्हणाले, “तुम्ही महाविद्यालयीन जीवनात असे काही करू शकलात याबाबत मला तुमचा हेवा वाटतो. पुढच्या जन्मी राष्ट्रीय सेवा योजनेचा (एन.एस.एस.) सेवक म्हणून काम करायला नक्की आवडेल.” पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. मुख्यमंत्र्यांनी वारीच्या मुक्क्माच्या ठिकाणी मोठ्या संख्येने शौचालये बांधली आहेत, त्यामुळे वारी गेल्यानंतरही परिसर स्वच्छ राहतो. तसेच, या वेळी पाच लाख वारकऱ्यांना रेनकोट वाटसले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

 

कुलगुरू डॉ. करमळकर यांनी स्वागत करताना म्हणाले की, रेकॉर्ड करणे हे आमचे साध्य नाही, तर वारीत निर्मळता, शुद्धता व पावित्र्य राखण्याचे काम आम्हाला करायचे आहे.

 

श्री. राजेश पांडे यांनी संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, वारीच्या या उपक्रमाद्वारे वारीच्या मार्गावर ३५ हजार विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. पत्रावळ्यांच्या वाटपातून तब्बल एक कोटी लिटर पाण्याची बचत होणार आहे, काही टन जैविक खताची निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर २० हजार रोपे वारीच्या मार्गावर लावली जाणार आहेत. हा केवळ एक ‘इव्हेंट’ नसून, एका चळवळीची सुरूवात आहे. याला पाठिंबा दिल्याबाबत त्यांनी राज्य शासनाचे व पालकमंत्र्याचे विशेष आभार मानले.

 

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. प्रभाकर देसाई यांनी मानले. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे सल्लागार श्री. मिलिंद वेर्लेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या विक्रमासाठी राज्य सरकारच्या वन विभागाने इतक्या मोठ्या संख्येने प्रयत्नपूर्वक रोपे उपलब्ध करून दिली.

 

गिनीज विक्रम काय?

एकाच ठिकाणी एकाच प्रकारची १६,७३१ रोपे वाटण्यात आली. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये केली जाणार आहे. याआधी दुबईतील एका शाळेने ९४७१ रोपांचे वाटप करून विक्रम केला होता. तो आज मोडण्यात आला. या विक्रमाचे अर्जदार कुलगुरू डॉ. करमळकर आहेत. ही रोपे जगवण्याची व वाढवण्याची जबाबदारी वारीच्या मार्गावरील महाविद्यालयांकडे देण्यात येणार आहे.