राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेण्यासाठी संघाचा अनुभव घ्यावा लागतो : रा. स्व. संघाचे सुहास हिरेमठ यांचे मत

Share this News:

पुणे 23/8/2019 : सध्याच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अनुकूलता वाढलेली दिसून येते. अनेकजण संघामध्ये येऊ इच्छित आहेत. संघ काय आहे हे एखाद्याला समजले की तो संघाचाच होऊन जातो. संघाबाहेर राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय आहे, हे समजणे अवघड आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेण्यासाठी संघाचा अनुभव घ्यावा लागतो. कोणी कितीही आरडाओरडा, टिका केली तरीदेखील संघाचे कार्य वाढत जाणार आहे कारण हे परमेश्वराचे काम आहे, असे मत रा.स्व.संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी व्यक्त केले.

दाजी खेडकर गौरव समितीतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दाजी खेडकर यांच्या जीवनावर आधारित दाजी खेडकर गौरव ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी दाजी खेडकर, त्यांच्या पत्नी शुभदा खेडकर, पुस्तकाचे लेखक डॉ. शरद कुंटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, ज्येष्ठ स्वा. सैनिक वसंतराव प्रसादे, जयंत म्हाळगी, मुरलीधर घळसासी, दामोदर जोशी यांसह संघ परिवारातील अनेक ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होते.

नरहर तथा दाजी खेडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. ऐन उमेदीची १७-१८ वर्षे त्यांनी शिरुर, देवगिरी, बीड व कोल्हापूरमध्ये त्यांनी प्रचारक म्हणून काम केले आहे. त्यांच्या वयास ८० वर्षे पूर्ण होत असून त्यांच्या प्रचारक असतानाच्या जीवनातील अनुभवांना ग्रंथरुपाने समाजासमोर आणण्यात आले आहेत.

सुहास हिरेमठ म्हणाले, संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी संघकार्य हे ईश्वरी कार्य आहे असेच म्हटले आहे. संघामध्ये कार्य करताना अडचणी, मतभेद,आर्थिक नुकसान झाले तरीदेखील हे कार्य मी करीतच राहीन, अशी भावना मनात उत्पन्न होते. मनामध्ये भक्ती, श्रध्दा, नीष्ठा उत्पन्न होते. तेव्हा माणूस देशासाठी काहीही करायला तयार होतो. देश, धर्म, समाज यांसाठी बलिदान द्यायला देखील माणूस तयार होतो. सामान्य माणसे देखील असमान्य कार्य करतात.

दाजी खेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगण्याची गोष्ट आहे बोलण्याची नाही. संघ ही अनुभवण्याची गोष्ट आहे, ऐकण्याची नाही. संघाचे काम करत असताना काम करण्यासाठी प्रेरणा देणारे अनेक प्रसंग अनुभवले. ज्या गोष्टी मी जगलो आहे त्या या पुस्तकामधून मांडण्यात आल्या आहेत.

डॉ. शरद कुंटे म्हणाले, यशाची शिखरे चढणारी अनेक माणसे दिसतात. परंतु पाठीमागे काम करणारे अनेक कार्यकर्ते अनेक लोक आहेत. अशी माणसे प्रसिध्दीपासून दूर आहेत. संघाचे कार्य प्रत्येकाच्या समोर यायला हवे. संघ काय आहे हे समजण्याची गरज आहे. संघ समजण्यासाठी या पुस्तकात दाजींनी केलेले कार्य, त्यांचे अनुभव, विविध प्रसंग मांडले आहेत.  पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर घळसासी यांनी आभार मानले.