विवेकबुध्दी जागृत ठेवून मतदानाचा हक्क बजावा 

Share this News:
राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांचे मत; हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शोभायात्रा आणि ग्रामगुढी
पुणे : सध्या सगळ्या बाजूने शत्रू आपल्यावर आक्रमण करीत आहे. अशा विविध आक्रमणांमुळे अघोषित असे युद्ध चालूच आहे. भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध चालणारे हे देशशत्रूंनी आपल्यावर लादलेले भयानक, विकृत असे युद्ध आम्ही कायमचे जिंकून दाखवू. यासाठी या गुढीला साक्ष ठेवून, प्रतिज्ञा करून आपल्या कार्याला उभे रहायचे आहे. शंभर टक्के मतदानाचा आज आपल्याला संकल्प करायचा आहे. आपली विवेकबुध्दी जागृत ठेवून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला आहे की नाही याची काळजी करायची आहे, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा ते अप्पा बळवंत चौकातील तांबडी जोगेश्वरी मंदिरा दरम्यान भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह. भ. प. चारुदत्त आफळे तसेच एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास संस्थेतील विद्याथर््यांच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, महात्मा फुले मंडई विद्यापीठ प्रतिष्ठानचे मा बाळासाहेब मालुसरे, मोतीबाग नगर संघचालक शरदराव चंद्रचूड, सह संघचालक प्रमोदजी बेंद्रे, नगरसेवक हेमंत रासने उपस्थित होते. ग्रामदेवतेचे पूजन करुन ग्रामगुढी उभारण्यात आली.
ह. भ. प. चारुदत्त आफळे म्हणाले, गुढीपाडव्याचा हा सण हाणून पाडावा म्हणून एक विकृत प्रचार असा केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा या गोष्टीशी काहीही संबध नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून, रामचंद्रांच्या काळापासून गुढी उभारण्याची प्रथा आहे. संत तुकारामांच्या गाथेत, महाभारतामध्ये देखील गुढीचा उल्लेख आहे.
मंडईतील टिळक पुतळ्यापासून सुरु झालेल्या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, बाजीराव पेशवे आदींच्या वेशात चिमुकले सहभागी झाले होते. याशिवाय शंभर टक्के मतदान करुया,मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशा संदेश फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली. श्रीराम रथ, बँड पथक, ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, भारतमाता रथ, समरसता रथ, लोकमान्य टिळक स्मृती रथ, ढोल-ताशा पथक देखील सहभागी झाले होते. नगरातील स्वयंसेवकांनी वेत्र चर्मची प्रात्यक्षिके सादर केली. प्रात्यक्षिके पाहण्यासोबत शोभायात्रेचे स्वागत करण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. पारंपरिक वेशातील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
लोकमान्य टिळक पुतळा मंडई येथून निघालेल्या शोभायात्रेचा शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे समारोप झाला. शोभायात्रेतील सर्व व्यवस्था अरविंदराव रावेतकर, हेमंत निफाडकर, नरेश ओझा आणि महेश फरांदे यांनी केली होती. संयोजक शरदराव गंजीवाले आणि सह संयोजक अश्विन देवळणकर यांनी शोभयात्रेचे नियोजन केले. शोभा यात्रेच्या नियोजनात साईनाथ मंडळाचे पियुष शाह, संयुक्त प्रसाद मंडळाचे अजित परांजपे, जयहिंद मंडळाचे बाळासाहेब मोरे, विजयभाऊ मारटकर, मुठेश्वर मंडळाचे गणेश भोकरे यांचा सहभाग होता.