कुणीही सत्तेचा ताम्रपट घेवून आलेला नाही सत्ता येत-जात असते – अजित पवार

Share this News:

बीड दि. १७ – तुम्हाला सत्तेची मस्ती आली आहे.अरे सत्ता ही येत असते जात असते आपण कुणीही सत्तेचा ताम्रपट घेवून आलेलो नाही. अशा मस्तीत राहून सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठलेल्या सरकारला वठणीवर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी बीडच्या जाहीर सभेत दिला.

बीड जिल्हयाच्या पाटोदा तालुक्यात भव्य जाहीर सभेनंतर बीड शहरामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. बीडच्या सिध्दीविनायक कॉम्प्लेक्सच्या मैदानावर झालेल्या या सभेला बीडमधील जनतेने मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही जाहीर सभा पार पडली. या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आमदार राजेश टोपे, आमदार अमरसिंह पंडीत, आमदार सतिष चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, आमदार विदया चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार रामराव वडकुते, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, विदयार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, युवा नेते संदिप क्षीरसागर, बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे, युवकचे सरचिटणीस मेहबूब शेख, माजी आमदार उषा दराडे, महिला जिल्हाध्यक्षा रेखा फड, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, प्रदेशचे सरचिटणीस बसवराज नागराळकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

देशाला आज बुलेट ट्रेनची काय आवश्यकता आहे. कशासाठी हे खुळ आहे. आज याची गरज आहे का ? असा सवाल करतानाच अजित पवार यांनी ज्या मुलभूत समस्या आहेत त्याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. या सरकारने आजपर्यंत बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला एक रुपयाही दिला नाही. कशासाठी राज्य करता असा संतप्त सवाल अजित पवार यांनी सरकारला केला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार असताना माझ्या गरीब शेतकऱ्याला का नडवताय असा जाब सरकारला विचारला.

भीमा कोरेगाव प्रकरणात निष्पाप लोकांवर सरकार कारवाई करत आहे. तरुणांना नाहक त्रास देत आहे. त्यामुळे निष्पाप लोकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा हा महाराष्ट्र आहे. परंतु काही मनुवादी संस्कृती गलिच्छ राजकारण करते आहे. त्यामुळे तुमच्या-माझ्या महाराष्ट्राला हे परवडणारे नाही. तुम्ही मी हाडामासाची माणसं आहोत. जातीच्या भिंतीपलिकडे जावून काम करण्याची गरज असल्याचेही अजित पवार म्हणाले.

या सभेच्या सुरुवातीला पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, युवा नेते संदीप
क्षीरसागर, माजी आमदार राजेंद्र जगताप यांची भाषणे झाली.

*त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. **‘मोफत का चंदन, घीस मेरे लल्ला ‘या म्हणीप्रमाणे भाजप सरकार लोकांच्या घामाच्या पैशाचा वापर स्वतः च्या जाहीरातीसाठी करत आहे असा आरोप सुनिल तटकरे यांनी जाहीर सभेत केला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची जशी मागणी आम्ही केलेली आहे. त्याप्रमाणेच मागच्या चार वर्षापासून ज्यांचे वीज बील थकित आहे. त्यांचे वीज बिल माफ झाले पाहीजे ही मागणी घेवून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठे आंदोलन उभारेल असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनाला ज्याप्रकारे जोरदार पांठिबा मिळत आहे. तो पाहता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता वारं गेल्याचे स्पष्ट दिसत आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.*

*तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे सरकार ऑनलाईन घोटाळ्यात अडकले आहे. या सरकारला सध्या ऑनलाईनचा नाद लागला असून तुम्ही निर्णय घेतला तर हे सरकार ऑफलाईन जायला वेळ लागणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी जनतेमध्ये निर्माण केला. आज तुमचा खिसा सरकार कसा कापत आहे हे कळूपण देत नाहीय. किती शातीर या सरकारमधील लोक आहेत हे समोर येत आहे असे सांगतानाच धनंजय मुंडे यांनी फक्त ४१९ दिवस शिल्लक असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी
उभे रहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.*

आज दिवसभरात तीन सभा पार पडल्या. या सभांना जनतेने मोठा प्रतिसाद दिला.काहींनी तर सरकारविरोधी संतापही व्यक्त केला. बीड जिल्हयाच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल यात्रेचे जोरदार स्वागत केले.