पुणे शहरात आज सहा ठिकाणी महावितरण ग्राहक संपर्क अभियान
पुणे, दि. 10 : वीजग्राहकांचे विविध प्रश्न, तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी महावितरणच्या वतीने पुणे परिमंडलात मंगळवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता महावितरण ग्राहक संपर्क अभियान सुरु होत आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवशी एकूण सहा ठिकाणी ग्राहक संपर्क अभियान आयोजित करण्यात आले आहे.
महावितरण ग्राहक संपर्क अभियानात मंगळवारी (दि. 11) संपूर्ण पद्मावती विभागातील वीजग्राहकांसाठी पद्मावती विभाग कार्यालय येथे तर हडपसर उपविभाग-2, वडगाव शेरी उपविभाग, सेंटमेरी उपविभाग व वारजे उपविभागांतील वीजग्राहकांसाठी उपविभाग कार्यालयाच्याच ठिकाणी ग्राहक संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वडगाव धायरी उपविभाग अंतर्गत नांदेड गाव येथेही हे अभियान होणार आहे. पद्मावती विभागातील तसेच हडपसर-2, वारजे, वडगाव शेरी, सेंटमेरी या उपविभागांतील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणच्या या अभियानात वीजबिल दुरुस्ती, नवीन वीजजोडणी, वीजबिलाच्या नावात बदल, सदोष वीजमीटर किंवा रोहित्र बदलणे, वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्ती आदींबाबत अर्ज, तक्रारी, निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत. या अभियानात आलेल्या अर्ज किंवा तक्रारींचा शक्यतो जागेवरच निपटारा करण्यात येणार असून शिल्लक राहिलेल्या तक्रारी ठराविक वेळेत सोडविण्यात येऊन त्यासंबंधी ग्राहकांनाही कळविण्यात येणार आहे. या अभियानात कार्यकारी अभियंता, संबंधित उपविभागांचे अभियंते, लेखा अधिकारी तसेच कर्मचारी वीजविषयक तक्रारी तत्परतेने सोडविण्याची कार्यवाही करणार आहे. याशिवाय महावितरणच्या विविध योजना, वीजसुरक्षा, वीजग्राहकांसाठी असलेल्या महावितरण मोबाईल अॅपचे फायदे, वीजग्राहकांचा मोबाईल क्रमांकांची नोंदणी, महावितरणच्या विविध ग्राहकसेवा आदींची माहितीही दिली जाणार आहे.
